पान:स्वरांत.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 " बरीन् चा खून झाला. तुला कळलं ?
 मनीष कलकत्याला गेलाय." तिनं सांगितलं.
 "हं ..." म्हणत त्यानं हातातला घास पानात टाकला होता-
 " कधीतरी तो जायचाच होता. काल तो ... उद्या मी... परवा मनीष."
 पुन्हा गप्प बसत त्यानं दोन घास खाल्ले होते. आणि पुन्हा आवेगानं बोलू लागला होता.
 " रीना ! पाय, मन, सारं थकलंय. एक सुंदर स्वप्न मनाशी जपलं नि नकळत्या कोवळ्या वयात जाळ्यात अडकलो. तेव्हा ध्यास होता फक्त तुझा. तुझे न्हालेले ओले केस ... भांगातून कपाळावर उतरणारी सिंदुरी रेघ. त्या केसांचा मंद ओलसर गंध माझ्या नाकात दरवळायचा. जिवाला हवी असायचीस तू. फक्त तू.
 "तुला लाल पत्रक लावताना पाहिलं. तुझ्या जवळ यावं, तुझ्या मनात माझ्याविषयी जवळिक निर्माण व्हावी म्हणून या वाटनं आलो.
 " आल्यावर कळलं, तू कधीच मिळणार नव्हतीस. नि परतण्याच्या वाटा विजेरी काटयांनी येताक्षणीच बंद झाल्या होत्या. न संपणारा, क्षितीजहीन"
 आपल्याठी, फक्त आपल्यासाठी असीम घरदार सोडून या वाटेनं आला ह्या जाणीवेनं ती सैरभैर होऊन गेली होती. आजवर जे कधी मिळालं नव्हतं, कधी मागितलं नव्हतं असं काहीतरी विलक्षण हाती यावं आणि अनामिक तृप्तीच्या लाटांनी सारा भूतकाळ झोकाळून जावा तशी ती भारून गेली. त्या क्षणी तिला असीम हवासा वाटला, फार हवासा वाटला.

मृत्यूव पथे /९१