पान:स्वरांत.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि होती तशीच होती. अलीकडे दहशत कमी व्हायला लागली होती. सरकारात उलथापालथ झाली. रोज संघटनेतल्या कुणा ना कुणाचा खून होऊ लागला. गेल्या दोन महिन्यांत वरच्या फळीतले चारजण मारले गेले होते.
 चार दिवसांपूर्वी बरीन् मारला गेला होता. प्रचंड झोताच्या आवेगात सापडावं नि पुढेपुढे लोटलं जावं तसं आयुष्य. घरापासून तुटलेलं !
 नव्या बांगला देशातून शस्त्रं आणताना पाठलाग झाला. मोठ्या मुष्कीलीनं तो इथवर येऊन पोचला होता. त्या चढत्या रात्री.
 "चल भात खाऊन घे -"
 रीनानं त्याला तंद्रीतून जागं केलं.
 मोकळे केस पाठीवर फैलावून रीना त्याला वाढत होती. याच रेशमी केसांची मऊ शाल अंगावर पांघरून झोपण्याचं सुंदर स्वप्न त्यानं फार पूर्वी रंगवलं होतं. आता त्या केसात एखादा सोनेरी केस चमकू लागला होता. तेच धारदार नाक. दाट केस चकमकते डोळे. एक प्रचंड वादळ त्याच्या तनामनातून वाहून गेलं.
 "पोटभर खा, बाबा ! कधी जेवला असशील कुणास ठाळक !" त्याच्या ताटात भात वाढीत रीना म्हणाली होती.
 "रीना, तुझे हे फैलावलेले केस. तुझ्या नजरेतला आग्रह. वाटतंय, एखादं घर तृप्त केलं असतंस. कशाला आलीस या वाटेनं ?"
 " ... मनीष तुला"
 त्याला काहीतरी विचारायचं होतं. तो एकदम गप्प झाला. नि मनापासून जेवू लागला.

९० /स्वरांत