पान:स्वरांत.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " अरे एक पत्रक पुरायचं नाही या कोबीच्या गड्याच्या घराला. चांगली चार पाच लाव- " रीना म्हणत होती- खुसखुस हसत होती. पत्रकावर लाल रंगात लिहिलं होतं-
 'आमार चेअरमन माओ.
 माओ चिरायू होवो.
 बाजूला माओचं रेखांकित चित्र.
 तिच्या ओढीनं तो या वाटेला आला. वाटायचं, तिच्या जवळ जाता येईल. गुप्त बैठकांना जायचा. कॅम्पस् ना हळूहळू तिचं आकर्षण फिकट बनत गेलं होतं.
 विचारांचं ... नव्या क्रांतीचं ... उगवत्या राज्याच्या स्वप्नांचं आकर्षण वाढत गेलं. तो पुरा अडकला. आता रीना होती एक निष्ठावंत सहकारिणी.
 आदिवासी, दलित, झोपडपट्टी अशा वस्त्यांतून मनं पेटवीत हिंडायचं. संघटनेच्या शक्तीचं दर्शन म्हणून एखाद्या क्रूर जमीनदाराचा वा कारखान्यातल्या अधिकाऱ्याचा खून पाडायचा. पुन्हा जंगलात दडून बसायचं. पुन्हा खून. पुन्हा सीमेलगतची वणवण. कधी भूतान- तिबेट करीत शस्त्रं आणायची.
 कधीतरी घरही खूप दूर राहिलं होतं. उरला होता सततचा पाठलाग. खुनी प्रत्युत्तरं आणि बंदुकीच्या फैरीचे आवाज. पोलिसांना झुकांड्या देण्यात, प्रस्थापितांची डोकी छाटण्यात मस्त कैफ असायचा. मदिरेचा फेस फसफसून खाली सांडावा तसं मन झिंगून जायचं.
 दहा वर्ष कशी संपली कळलं नाही. या विचारानं पीडलेली माणसं पेटून निघतील असं वाटलं होतं. शतकानुशतकांच्या चौकटी चूर होतीलसं वाटलं होत. पण माणसांची मनं तिथंच,

मृत्यूव पथे / ८९