पान:स्वरांत.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटणारे नाही. माझी खात्री आहे. कधीतरी मला तुम्ही हवेसे वाटाल. मी खरंच प्रयत्न करीन पण तो पर्यंत तुम्हाला उपाशी ठेवण्याचं पातक मी करणार नाही I Promicse you. मी तुम्हाला को-ऑपरेशन देण्याचा नक्की. प्रयत्न करीन...'
 तिला बोलताना खूप धाप लागलीय. ती सुरईतलं पाणी पेल्यात ओतते नि गटागट पिऊन टाकते नि पदराने कपाळा वरचा घाम टिपून घेते. तो मिशीतल्या मिशीत हसतो. आणि बोलू लागतो,
 'रोशन, तुझं माझ्यावर जेव्हा प्रेम बसेल ना तेव्हा सांग. तोवर थांबायची माझी तयारी आहे ... शरीराचे अघोरी खेळ मलाही नको आहेत ... I hate it. मी तुझ्याबरोबर आहे. निर्धास्तपणे झोप ...'
 तो पुन्हा डोळ्यांसमोर पुस्तक धरतो. खूप वेळ ती जागीच. तो ही पुस्तक वाचतोय. कधीतरी झोप लागलेली.
 आकाशमोगरीच्या फुलांचा घनदाट गंध श्वासातून धुसमटतो. ती जागी होते. पहाटेचा अंधुक चंदेरी प्रकाश खिडकीतून आत आला आहे. अंगावरची साडी सारखी करीत ती खिडकीत येते. बुचाची उंच उंच झाडं पांढऱ्या घोसांनी लगडली आहेत. खाली टवटवीत फुलांचा दाट गालिचा सांडलाय. त्या मादक गंधाच्या लाटा श्वासातून थेट रक्तात मिसळून जातात. ती धावत बाहेर येते नि ताजी फुलं वेचून खोलीत आणते.
 समोर तो गाढ झोपलाय. मिटलेल्या पापण्यांची दाट झालर. गव्हाळ रंग, पिळदार मिशा ... तो शांत झोपलाय. अगदी शांत, नितांत शांत. ती हळूच त्याच्या कॉटवर बसते.

तुझियामाझ्यामध्ये पहाट झाली सेतू / ८१