पान:स्वरांत.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'ठीक' म्हणत तो पुढे चालायला लागतो. मागे तीही झुलत झुलत चालत राहते.
 ...'गिरिविहार' मधली उंच डोंगरावरची खोली, अंधारी रात्र, आत दोन कॉटस्. एकमेकांना जोडलेल्या. वरती बॉम्बे डॉइंगच्या फुलपाखरी चादरी. शेजारी राजवर्खी सुरई... निळागुलाबी नक्षीचा पेला. ती वॉश घेऊन बाहेर येते. त्याने दोन्ही कॉटस् दोन भिंतीना लावलेल्या आहेत. मध्ये भलं मोठं अंतर. आरामात सिगारेट ओढीत तो वाचतोय. तिची चाहूल लागते नि तो उठून बसतो.
 'सिगारेट ओढलेली चालेल ना तुम्हाला? रूमचं दार बंद करायला हवं पण खिडकी उघडी ठेवलीय मी. हॅव ए रेस्ट. काही हेल्प लागली तर सांगा. मी जरा वाचत पडतो ...'
 'मी ... मला काही सांगायचंय.' तिचे अडखळते शब्द.
 'बोला ना ... भय वाटतं माझं? ' तो तिच्यावर नजर रोखीत विचारतो.
 'अं ... ? ' ती सैरभैर. हरवलेली. काहीतरी अवघड सांगायचंय पण शब्द हरवलेले.
 'रात्र झालीय. प्रत्येक स्त्रीला पहिल्या रात्री पतीला जे द्यावं लागतं ते मी द्यायला तयार आहे. पण मी खरं सांगू? ... हा व्यवहार फक्त दोन शरिरांचाच राहतो. ज्याच्यावर मी प्रेम करते, अशा तरुणाला तनमन द्यायला खूप आवडलं असतं मला ... ! अजून तरी माझं प्रेम तुमच्यावर बसलेलं नाही. तुम्ही खूप सरळ आहात. साधे आहात, पण अजून हवे हवेसे

८० /स्वरांत