पान:स्वरांत.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनासमोर उभी-आडवी नाचून जातात. त्याची विलक्षण किळस येते. दू ऽऽऽ र पळून जावंसं वाटतं. विषानं माखलेली धारदार नजर ती त्याच्याकडे फेकते.
 ...बाहीचं बटण तोंडानं चावीत तो कुठं तरी उगाच बघतोय. तिला जाणवतं, त्याच्या मिशा खूप कोवळ्या आहेत. पीळ देऊन पिळदार केलेल्या मिशीवरून तिची नजर हळूच ओठांना पाहून घेते. लालबुंद ओठ. छोटेसेच. दुधाच्या सायीचा थर अजून ओठांवर पसरलाय.
 एक कोवळी लहर अंगभर सरसरून जाते. ती भानावर येते. तिला स्वत:चाच खूप राग येतो. नि ती पुन्हा नजर खिडकीबाहेर काढते.

  

 गाडी थांबलेली.
 माथेरानचं झाडांनी वेढलेलं स्टेशन. हॉटेलवाल्यांची झुंबड. तो निर्विकारपणे वर आभाळाकडे पाहात उभा.
 'कुठल्या हॉटेलमध्ये उतरायचं? सांगा ना!'
 'अं ?' तो दचकून तिच्याकडे पाहतो. 'मी काय सांग? तुमच्या मागे येईन. यायलाच हवं' त्याच्या स्वरात अलिप्तता. तो बहुधा आतून रागावलाय. जाम वैतागलाय. तिला खुद्कन हसायला होतं.
 'अंह, तुम्ही नवरा आहात. तुम्ही निर्णय घ्यायचा. मी येईन तुमच्या मागे.'

तुझियामाझ्यामध्ये पहाट झाली सेतू /७९