पान:स्वरांत.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मंद मंद पुढे सरकणारी गाडी.
 चढतीचा रस्ता. ती खिडकीतून केव्हाची बाहेर बघतेय.
 तो शेजारी.
 थोडासा दूर...तो तिच्याजवळ सरकतो.
 ती दचकून एकदम मागे सरकते. डोंगरावरून कोसळणारं चंदेरी पाणी थेट डब्यातून आत झिरमिरतं. त्या पाण्याचे थेंब तिच्या केसांवर चमकताहेत. ओला ओला आरसपानी चेहरा. खूप जवळ असणारा.
 त्याच्या नसांतून रक्ताची प्रचंड लाट उसळून धडपडत जाते. हात शिवशिवतात. ती त्याच्याकडे पाहते. तो एकटक बघतोय. ती पुन्हा सावरून बसते. खिडकीला लगटून.
 तो उठतो नि दुसऱ्या टोकाच्या खिडकीतून बाहेर बघत बसतो. काळ्याशार करवंदांनी तुडुंब भरलेला हिरवा द्रोण घेतो. तिच्यासमोर धरतो. चार करवंदं ती मुकाट्याने उचलते . नि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावते. बाहेर तरणाताठा निसर्ग. काळ्याभोर कातळातून झिरपणाऱ्या चंद्रवेली.
 हिरवे झुलते मनोरे. वर निळाभोर तलाव नि पहाटेसारखी ओली हवा. अंगावरची शाल ती अंगभर घट्ट आवळून घेते. शालीचा कोमट स्पर्श जाणवतो नि मग पुन्हा डोळयांसमोर उभा राहतो तो. तिचा नवरा. अजित शिर्के.
 कसा वागेल तो?
 दिवसा...
 रात्री...
 त्याच्या नितांत निकटपणाची उलटीपालटी चित्रं तिच्या

७८ /स्वरांत