पान:स्वरांत.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चढणाऱ्या धुरांच्या रेषा. समोर त्यांचा जावई अवघडून बसलाय. पपांचा चेहरा...मन उघड्या पेपरनी झाकलेलं. घनघोर पावसात भिजलेलं चिमणं पिल्लू वळचणीच्या टोकाशी घाबरंघुबरं बसावं तसा तो. तिचा नवरा. अजित शिर्के. त्याच्याही हातात कुठलंसं मासिक, त्याची नजर तिच्यावर पडते. तो अंधुकसा हसतो. तीही हसते.
 'चहा घेणार थोडा? दहीभात खाऊन निघू या. साडेनऊच्या एक्सप्रेसचं रिझर्वेशन आहे. गेट रेडी.'
 तिचा आवाज ऐकून पपा वर्तमानपत्र दूर करतात.
 'अरे तुम्ही लोक आज माथेरानला पळणार नाही का? ओ. के. ओके! बाबूला म्हणावं गाडी काढ बाहेर आणि कालचे हार चढव म्हणावं तिच्यावर.'
 बोलता बोलता खिशातून पाकीट काढीत त्यातल्या पाच हिरव्या नोटा पपा टेबलावर ठेवतात.
 'रोशा बेटा, एन्जॉय करा. हे दिवस पुन्हा कधीच हाती लागत नाहीत. खूप मजा करा. खूप...!! बी हॅपी-माय गर्ल.'
 बहुधा पपांचा आवाज हल्लक झाला असावा.
 तिला त्या नोटा खुपतात.
 'सॉरी! पपा, हनीमूनसाठी निघालोय आम्ही. नि पैसे कशाला हवेत? शिवाय अजित रिकाम्या खिशाने थोडेच आले असणार?'
 ती झटक्यात आत निघून जाते.
 पपा पुन्हा डोळ्यांवर पेपर ओढून बसतात.

  

तुझियामाझ्यामध्ये पहाट झाली सेतू / ७७