पान:स्वरांत.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मग पपांची धुसफूस. पपांच्या स्टेटसला शोभेसा खानदानी मुलगा नाकारल्याचा डंख. नंतर पुन्हा दुसरा मुलगा. हा अँबेसेडर मागणारा. त्याची मागणी ऐकून ती मनोमन तडफडली.
 'पपा, केवळ तुम्हाला वचन दिलंय म्हणून जातीतला मुलगा पत्करीन मी. पण जीवनाविषयीच्या माझ्याही काही कल्पना आहेत, त्यांना मुरड घालणं परवडणारं नाही मला. हुंडा घेणारा मुलगा नकोय मला. लग्नही रजिस्टर व्हायला हवं. स्टेटस् चे घोळदार फुगे माझ्या मनात नाहीत. गरीव पण शिकलेला, स्वावलंबी नवरा चालेल मला.'
 त्यानंतर पपांशी बोलणं खुंटलं होतं. माँ बोलायचा प्रयत्न करायची. माँ निव्वळ बाहुली. तिची कधी कधी कीव यायची नि कधी खूप रागही.
 आठ दिवसांपूर्वी हा डॉक्टर सांगून आला, हुंडा न मागणारा. रोशननं त्याला पुसटसं पाहिलंय. तो कोण असेल, कसा असेल, याचा विचारच करायचा नाही, असं ठरवलं आहे. बळी जाताना निर्विकार मनानं जायचं. मरण आलं की चांगदेव म्हणे आत्मा ब्रह्मांडाच्या खुंटीला टांगून ठेवायचा. मनही तसंच दूर टांगता येतं. मग उरतात शरीराचे भोग.

  

 माँनी सामान भरून ठेवलंय. ती त्यातल्या खूपशा साड्या उचकटून बाहेर काढून टाकते. चार सहा हलक्या-फुलक्या साड्या छोट्याशा बॅगमध्ये भरून बाहेरच्या हॉलमध्ये येते.
 पपा टाईम्स वाचताहेत. तोंडात चिरूट. चिरुटाच्या वर

७६ /स्वरांत