पान:स्वरांत.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सावरली होती. पपांना हवं असलेलं वचन तिनं दिलेलं होतं. आता ती मुक्तपणे जगायला मोकळी होती.
 कधी युवक बिरादरीचा नितीन, कधी बाल आनंद मेळाव्याचा योगेश शहा ... सतत ती कुणा ना कुणाबरोबर दिसायची. आन्तरभारती; क्लब; लिओ असोसिएशनच्या भन्नाट पाटर्या ... कधी सहली. तऱ्हेतऱ्हेच्या साड्या ... तऱ्हेतऱ्हेचे दागिने ... असं तुफान वेगानं धावणारं लहरतं जीवन. तरीही ती निर्धाराने एका जागी पाय रोवून उभी असायची. एम. ए. पास झाली नि दुसऱ्याच दिवशी पपांनी एक जण घरी आणलान्. एक डॉक्टर. M. B. F. R. C. S. अशी लांबलचक डिग्री लावणारा. स्टेटसमध्ये सेटल होऊन तिथेच राहणारा. उंचापुरा नि नको तितका घारा. माँनी सांगितलेला साज घालून रोशा त्याच्यासमोर उभी राहिली.
 ' आय हेट इंडियन कल्चर. किती भयान घाण आहे या देशातं नि किती अंधश्रद्धा. तुम्हाला अमेरिकन फॅशन्स चार दिवसांत शिकवीन मी. ... डोन्ट मिस् अंडरस्टॅड मी. तसा मी अगदी कोरा आहे हैं.' त्याचं ओघळणारं हसणं.
 'मी माझ्या बायकोला साडी मुळीच नेसू देणार नाही. आय मीन तुम्हाला. युवर फॉर्म इज मोअर सुटेबल फॉर ...'
 तिला त्याचं बोलणं भयानक असह्य झालं. अंगभर पांघरलेलं खानदानीपण फेकून ती तडाड् तडकली.
 'डू यू बिलीव्ह इन कास्ट सिस्टीम ? एखाद्या अमेरिकन 'मेड ' बरोबर का केलं नाही लग्न ? एका भारतीय पोरीचा छळवाद कुणासाठी मांडणार तुम्ही ? आईबापांसाठी ?'

तुझियामाझ्यामध्ये पहाट झाली सेतू /७५