पान:स्वरांत.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'रोशा, ती ब्लू एलिफंटा पँट नि नेव्ही ब्लू झब्बा घाल. मी पण ब्लू चेक जर्सी घालतो.' असला आगाऊपणाही तो करी. पण कंपनी म्हणून बरा. शिवाय खूप हार्डवर्कर. पण ...
 मनाच्या खोलात तसा कुणी शिरलाच नाही, ज्याच्यावर अवघं आभाळ उधळून मोकळं व्हावं.
 सतीशची लाल स्कूटर दारात उभी राहिली की पपा अस्वस्थ व्हायचे. एक दिवस त्यांनी तिला बजावून सांगितलं,
 'तू नाटकात काम कर - भन्नाट ड्रायव्हिंग कर. थोडीफार पोरांबरोबर फीरही. लाईफ एंजॉय करायला मी अटकाव करणार नाही. पण देशमुखी रक्ताचा माझा अभिमान ... तुला माहिताय. तू एकुलती एक मुलगी आहेस माझी. कोणत्याही परजातीच्या मुलाशी तू लग्न केलेलं क्षणभरही खपवून घेणार नाही मी...मला वाद नकोय.'
 तरीही तिने आवाज पुढे रेटला होता.
 'तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर खुशाल शिक्षण बंद करून टाका. मी मुलांबरोबर हिंडते पण नुसतं हिंडण्यासाठी नाही. कोणत्या ना कोणत्या कामाच्या संदर्भात. तुम्ही मला मोकळीक देता त्याचा दुरुपयोग होतोय, असं जर वाटत असेल तर माझ्या कुंवारपणाला तरी काय अर्थ आहे ? तुम्ही सांगाल त्याच्याशी ... तुमच्या जातीच्या कोणत्याही मुलाशी लग्न, करायला तयार आहे मी.'
 बोलता बोलता तिचे डोळे डबडबून आले होते. पपांनी पुन्हा कधीही हा विषय काढला नव्हता. नवनवीन कपडे, नवीन पुस्तकं यांचा वर्षाव मात्र वाढला होता. दोन दिवसांतच ती

७४ /स्वरांत