पान:स्वरांत.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तो सोळा नंबरमध्ये एकटाच. तिला मैत्रिणींशी गप्पा मारण्यातही इंटरेस्ट येत नाही. कसली तरी अनामिक भीती मनातून झिरपत राहते. ती डोळे मिटून गप्प पडून राहते.
 'रोशा थकलीय. मालव बाई दिवा. पडलं पार एकदाचं लग्नं.'
 मग काळाभोर अंधार. वर मिणमिणता जांभळा दिवा.
 आज माँ नि पपांना शांत झोप लागली असेल.

० ० ०

 रोशन : एक अवघड प्रॉब्लेम.
 रोशन: बेअब्रूच्या शक्यतेची टांगती तलवार.
 बापाच्या डनलॉप स्टेटसवर केव्हाही कोसळू पाहणारी !
 रोशन देसाई : धगधगत्या अग्निफुलांचा रेशमी बहर. वर्गातला सोहन अगरवाल. त्याच्याबरोबर भटकायला आवडायचं. खूप इंटलिजंट नि मुख्य म्हणजे पोरोंसमोर लाळ घोटत न बोलणारा. तपकिरी गाभुळी नजर रोखीत तो बोलायला लागला की क्षणभर श्वास धकधकायचा. कधी कधी बाहीचं बटण चावीत वेड्यासारखा निःशब्द बसून राहायचा. मग रोशा खट्याळपणे म्हणायची, 'चल वाबा रूपालीत तुला खाऊ घालते. बटणाला का ताप देतोस ? '
 ... यूथ सेंटरचा सतीश धवन. तुफान ॲग्रेसिव्ह. विचार करायला वेळच द्यायचा नाही. नेहमी कोणती ना कोणती इन्विटेशन्स घेऊन हा हजर असायचा- रोशन जॉईंट सेक्रेटरी म्हणजे जायलाच हवं.

तुझियामाझ्यामध्ये पहाटे झाली सेतू /७३