पान:स्वरांत.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेते. तिचं अंग चोरणं त्याच्याही लक्षात आलं असावं. तो पुन्हा अवघडून बसतो.
 नि मग पुन्हा दोघेही चमचा... चमचा आईस्क्रीम चाटीत बसतात.

○ ○ ○

 आता हॉलमधली गर्दी विरळ झालेली. रिसेप्शन मूड संपलेला आहे. ती मैत्रिणींच्या घोळक्यात. तोही मित्रांच्यात जाऊन बसलेला आहे. मग जेवणाची पिठलं- भाताची पंगत. पुन्हा शेजारी तो नवखासा तरुण. जेवताजेवता हलक्या आवाजात ती त्याला बजावते-
 'सगळ्यांच्या देखत खोलीत येण्याचा फार्स मला पसंत नाही. अन् टॉलरेबल फॉर मी ... ॲटलीस्ट ! उद्या सकाळी माथेरानला निघायचं आहेच ...'
 तिच्या शब्दांचे ताठपण त्याला जाणवते. तो मंदसा हसतो, त्याचे दात चिमणे चिमणे आहेत. मध्ये हलक्याशा फटी.. तपकिरी डोळे. निवळलेल्या पाण्यासारखे संथ नि शांत. या क्षणी तिला त्याचे डोळे आवडतात. पण डोळयांबरोबर थोडंच आयुष्य काढायचंय?
 'रोशन. तिसऱ्या मजल्यावरची सोळा नंबरची रूम बुक केलीय. तुला सोडायला येतो आम्ही...'
 मैत्रिणींना बहुधा माँनी पाठवलं असावं.
 'आज खूप गप्पा मारूयात आपण इथेच, तुमच्याजवळ झोपते बाई मी. कुणास ठाऊक पुन्हा कधी असं मनमुक्त जीवन मिळेल की नाही...' तिचा हट्ट.

७२ /स्वरांत