पान:स्वरांत.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवाजात तिने गाणे म्हटले होते; ओऽ सजना... त्या सुरांनी ती दर्वळून गेली होती. चार दिवसांपूर्वी तिला अनोळखी असणारा अनंत तिचा 'सजन' बनला होता. गाणं संपण्यापूर्वीच अपार भारून तिने त्याच्या बाहूत स्वतःला झोकून दिले होते. मग नंतरची प्रत्येक रात्र हलक्या सुरांनी रंगायची. मग नितीनचा जन्म. मग केव्हातरी, हळू हळू अंधूक होत जाणारे सूर पार विरून गेले होते. उरले होते रुटीन. वयाच्या आठव्या वर्षापासून सोळा वर्ष आपण नुस्त्या गात नि गातच होतो ते ती पार विसरून गेली होती...
 गातागाताच तिचे डोळे भरून येतात; स्वर दाटून येतात. ती मधेच थांबते.
 रबिन दचकून डोळे उघडतो. ओंजळीत तोंड लपवून ती हुंदके देत असते. उरातला उमाळा श्वासाश्वासात मावत नाही. सारा देह गदगदून जातो. क्षणभर त्यालाही सुचेनासे होते.
 'मीरा....मीरा...'
 त्याचा मऊ आवाज. तिला आणखीनच भरून येतं. तिचा माथा हळूवारपणे वर उचलीत, तिच्या खांद्यावर थोपटीत तो हळुवारपणे म्हणतो,
 'मीरा, किसीकी याद आयीऽ... पगली. तू तर चार दिवसांनी पोचशील तुझ्या घरी.'
 आपण त्याच्यासमोर रडलो या जाणीवेने ती मनोमन शरमिंदी होते.
 'सॉरी रबिन्. मी वेड्यासारखीच वागले. असं रडायला नको होतं.... फार वर्षांनी गायले आज...'

६२ /स्वरांत