पान:स्वरांत.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून किती आग्रह करायचा तो. उमाकांतला नेहेमी जामायचा.
 'उम्या लेका इंद्राला पार कोळशात आणि फोडणीत बुडवलंस तू. पुरे करा आता वाढता संसार. हवा लागू दे जरा तिला !'
 ... का कुणास ठाऊक. त्याचा होणारा स्पर्श तिला वेगळा वाटला होता. काहींसा आतुर ... उत्सुक. क्षणभर वाटलं होतं डोकं दुखण्याचं निमित्त सांगून केन्द्रावर परतावं. पण गाड्यागाड्या भिंगोऱ्या खेळताना भोवळ येतेय वाटले, तरी गरगरतच राहावेसे वाटते तशी ती त्याच्याबरोबर भारल्यागत पावलं टाकीत राहिली होती ...
 ...................
 'इन्द्रा डोळे उघड. चक्कर आली?'
 तिचं मस्तक त्याच्या खांद्यावर असतं. ती झडझडून जागी होते. बाजूला सरकते. त्याच्याकडे बघायचीही शरम वाटते. नकळत डोळे भरून येतात.
 'इन्द्रा इतकी कशी तू खुळी ? एवढी एम. ए. झालीस निव्वळ मोगलाई छाप आहेस. तू त्या सुलोचना वाणीचा साधनेतला लेख वाचलास? आपण इण्डियन सेक्सचा भलताच बाऊ करून घेतो. ... अरे वा ! दोराहाचा प्रिमियर आहे वाटतं आज ? आपण आता एम्योरिअममध्ये शॉपिंग करू. मग 'शुद्ध वेजिटेरियन' मध्ये श्रीखंड पुरीचे जेवण घेऊन माझ्या हॉटेलवर जाऊ. तिथून थेट थिएटरवर जाऊ. रिंग करून टाक तुझ्या केन्द्रावर. दोराहा, चेतना दस्तकच्या युगात वावरतेस. थोडी फ्री हो. कमॉन !' तिचा दंड धरून तो रस्ता पार करतो.

वाढत्या सांजवेळे/५५