पान:स्वरांत.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'तू म्हणशील तर येतो संध्याकाळी मी, कॅनॉटप्लेसला जाऊया.'
 'ये की ! नाही तरी इंग्लिशमधून बोलायचे म्हणजे प्राणसंकटच. येच.'
 'तू म्हणत असशील तर सिमला - आगऱ्यालाही जाऊ.. कंपनी हवी अशा ठिकाणी जायचं तर ! ' तो हसत म्हणाला होता.
 'झालं ! तीन पोरांना नि नवऱ्याला टाकून आलेय मी!' तिनेही उत्तर दिले होते.
 गडद जांभळ्या फुलांची लक्ष्मीविष्णू टेरीवायल नेसून संध्याकाळी ती त्याची वाट बघत टेरेसवर उभी होती. हल्लक फुल्ल बनून. टॅक्सीने एक वळण घेतले नि त्या सरशी ती त्याच्या अंगावर कलंडली होती. सेंटचा हुळहुळता दर्प. त्याक्षणी उमाकांतचे डोळे आठवले होते. भावुक आणि संथ. तिला वाटलं होतं का आठवावेत ते डोळे ... ती नजर? मोहन का परका होता ? दर महिन्याला त्याची लातूरला खेप असायची. औषधं घ्यायला आला की दोनदोन दिवस मुक्काम ठोकायचा. ती स्वैपाकात गुंतलेली असायची. चहाच्या घुटक्यागणिक गप्पा रंगायच्या. पुण्या-मुंबईची ट्रिप, नव्या साड्या; शिनॉन की कायसं सिल्क; त्याचा सुंदर पोत. महाराजा ... ' सखाराम बाइंडर...गुड्डी...आचार्य रजनीश सगळ्यांची हजेरी लागायची.. ती नेहमी म्हणायची,
 'मोहन भावजी तुम्ही असे रसिक नि तुमचं गाव धुळीन रापलेलं. करमतं काहो निलंग्यात? ' तिने एम्. ए. व्हावं.

५४ /स्वरांत