पान:स्वरांत.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याच दिवशी सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन ती बंगालीबाबू बरोवर वाहेर पडली. समीर सेनही सेमिनारसाठीच आला. होता. दर महिन्याला त्याची दिल्लीला खेप असायची. दिल्ली दाखवायचे आश्वासन त्याने तिला दिलं होतं. मुक्तिसैन्यातल्या सैनिकांच्या मुलाखती घेण्यासाठी तो बांगला देशांत जाऊन आला होता. त्याची बडबड ऐकताना पार्लमेंट हाऊस कधी आले ते कळले नाही. कुण्या खासदाराला भेटण्यासाठी तो आत गेला आणि गोलखांबांची दाट किनार असलेल्या त्या वर्तुळाकार भव्य वास्तूंची भव्यता निरखीत ती हिरवळीवर बसून राहिली.
 'हॅलो, ... इंद्रा तू इथे कुठे ? '
 मोहन तिच्या जवळ उभा होता. तीही क्षणभर अवाक् झाली होती. दूर दिल्लीत पहिल्याच दिवशी इतकं जवळचं माणूस भेटेल असं वाटलंच नव्हतं.
 'यूथ लिडरशिप कँपसाठी आलेय मी. नि तू?'
 'ऑल इंडिया मेडिकल कॉन्फरन्स आहे सध्या इथे. . नाहीतरी निलंग्याचा कंटाळा आला की मी थेट दिल्ली गाठत असतो. मुंबईच्या गजगजाटापेक्षा दिल्लीत कसं गार वाटतं.'
 'एकटाच ?'
 'दिल्लीत यायचं ते निलंग्याची प्रत्येक निशाणी पुसून', फक्त मनमुक्त जगण्यासाठी. मग ते दुकटयांनी कशाला ? बरं काय काय पाहिलेस? ' विषय बदलत त्याने विचारले होते.
 'आज तर आलेय. एक बंगाली स्टुडंट गाठलाय दिल्ली दाखविण्यासाठी.'

वाढत्या सांजवेळे/५३