पान:स्वरांत.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आलं. दूर फेकून द्यावं तसं वाटलं. आपल्या बावळटपणाचं नि वेडपणाचं तिचं तिलाच हसू आलं होतं.
 अंगावरचा कोट नि हातातली आटोपशीर बॅग सावरीत तिने प्लॅटफॉर्मवर चुटकन् उडी मारली होती.
 रिक्षा वेगाने धावत होती. पार्लमेंटहाऊस, राष्ट्रपतिभवन, साऊथ अवेन्यू, त्रीमूर्ती...रेशमासारखे मऊ मऊ रस्ते. पहाटेचा फिकाफिका उजेड; चौरस्त्याच्या मध्यावर दाटीवाटीने फुललेली फुलांची गर्दी, दुतर्फा हारीने उभी राहिलेली हिरवी झाडे ... साऱ्या वातावरणाला येणारा एक हलका टवटवीत बसंती गंध ! ! !
 तिच्या खोलीतली पार्टनर अजून गाढ झोपेत होती. दार उघडत मिटत्या नजरेने तिने सलामी दिली होती.
 "ओह! गुडमॉनिग. हॅव ए रेस्ट ॲण्ड रिलॅक्स.ओ के !!"
 शेवटच्या शब्दाला ती झोपलीही होती. इन्द्राला मनोमन जाणवलं होतं की आपण दिल्लीत आलो आहोत आणि तेही चाणक्यपुरी मधल्या एका बड्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेलमध्ये.
 काचेचा दरवाजा उघडून ती बाल्कनीत आली. समोर होते शांत रस्ते ... रस्त्यांच्या कडेकडेने झगमगणारे. निरनिराळ्या देशांच्या वकिलातींचे बोर्डस्. तनभर ... मनभर पसरली एक टवटवी ... न्ह्यायल्यावर पसरते तशी. तीन मुलं, घर, नवरा, काळजी सारं दूर दूर राहिलं होतं. आता दिल्ली, ताज, मथुरा, अभ्यास, सेमिनार यांत आकंठ बुडून जायाचं होतं.

५२ /स्वरांत