पान:स्वरांत.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देणारं असावं हे एक लग्नापूर्वीचं झुळझुळीत स्वप्न. पण तीनही मुलं चक्क लातूरचीच.
 यूथ सेमिनारचं बोलावणं आलं; नि तिला जाणवलं आपण तरुण आहोत. फक्त तीस वर्षाच्या.
 आरशासमोर उभी राहायल्यावर तिला त्यातली 'काकू' बोचली होती. एक शेपटा; मानेवरच्या वळ्या; अंगभार साचलेला धुळवट राप. तिनं ठरवून टाकलं होतं दिल्लीचं आमंत्रण स्वीकरायचं ... सारी ओझी दूर फेकून द्यायची.
 दिल्लीला निघण्याच्या आदली रात्र. तीन आठवडे ती दूर जाणार म्हणून केवढा व्याकूळ झाला होता उमाकान्त. संध्याकाळीच तीनही मुलांना घेऊन तिची आई सोलापूरला परतली होती. खूप दिवसांनी घरात उरले होते ती आणि तो.. फक्त दोघे मनमोकळया शृंगारातलं काठोकाठ सुख जाणवून, तो विलक्षण अस्वस्थ बनला होता. मनात कुठेतरी रुखरुखला होता.
 इंद्रा नको ना जाऊस दिल्लीला दहा वर्षे निसटून गेल्याची जीवघेणी हळहळ मनाला टोचतेय बघ. आपण इथेच मस्त मजेत राहू ... अं? ... we will enjoy Second honey moon अं? ... तिच्या कानांत तो गुणगुणला होता.
 आणि 'दिल्ली आयो तो ए; उठणो कोई' पलीकडची मारवाडीण आपल्या पोरीला उठवत होती. तिला त्यातलं 'दिल्ली आयो ' कळलं नि ती तट्टकन उठली. पहाटेचा गार गार वारा ... हिमालयावरून येणारा. निऑनच्या जांभळया उजेडात चमकणारे एकाकी रस्ते. क्षणभर पोटात गलबलून

वाढत्या सांजवेळे / ५१