पान:स्वरांत.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्नांशी झुंजण्यात सारी शक्ती संपायची. कधी कधी वाटायचं चिंच मिठात घोळवताना ; माठात भरताना कशी लालचुटुक आणि तकतकीत असते. पण दिवस मागे पडतात नि ती पार काळी मिचूट होऊन जाते. आपणही तशाच ओशट झालो आहोत.
 कॉलेजला असताना प्रत्येक पहाटेला गंध असायचा. नव्या उमलत्या बूच फुलांचा माथ्यावर आभाळ होतं स्वप्नांनी खंचलेलं. प्रा. ब्रोकरे प्लासीच्या लढाईचे परिणाम गंभीर चेहेऱ्यांनी सांगायचे तेव्हा, हिच्या वहीवर असायच्या कवितांच्या ओळी.
 पदरात घेऊन जुईच्या कळ्या
 स्वप्न पहाटेसम,
 थांबले आहे रे तुझ्या अंगणात ...
 कशी कुणास ठाऊक पण ती उमाकांतच्या प्रेमात पडली होती. त्याचा सावळा रंग, धरधरीत नाक, ताठर हनुवटी ... धारदार बोचक नजर, दाट कुरळे केस, दणगट बांधा. कधी अग्नी ज्वालेसारखी झळाळणारी, कधी पाकळीसारखी मऊ बनणारी त्याची शब्दकला. त्या शब्दांच्या वेगात ती वाहायली होती. साऱ्या स्वप्नांची ओंजळ त्याच्यावर उधळून मोकळी झाली होती.
 तो त्याच्या मार्गाने जातच होता. पण ती मात्र मुलं, संसार, परंपरा, रूढी या वेटोळयात अडकून मागे पडली होती. आपल्या मुलांपैकी एखादं कश्मीरच्या धुंद क्षणांची साक्ष

५० /स्वरांत