पान:स्वरांत.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवणारा तिचा डावा हात अलगद हातात घेत तो म्हणतो. ती चमकून त्याच्याकडे बघते. तो घाईघाईने सांगतो;
 'हिने सांगितल्यात आणायला. तुझ्या पसंतीने घेऊ'
 तो मनोमन अस्वस्थ होतो. काहीसं अंतर राखून सावरून बसतो.
 तिला वाईट वाटतं. वाटतं ... उगाच संशय घेतला आपण. दूरच्या गावी इतक्या ओळखीचं माणूस अचानक भेटलं की जवळीक वाटणार ... त्याच्या कोमेजल्या मनावर फुंकर घालावी म्हणून ती नव्या उत्साहाने बोलू लागते. ... प्रश्न विचारू लागते. तिच्या किलबिलीनी तोही सुखावतो. सावरतो.
 'ही दिल्लीची चाट. एकदम मस्त. खा ही मिठ्ठी बघ तर... म्हणत तिच्या हातात पानांचा द्रोण तो कोंबतो. त्याची घाई पाहून तिलाही खुदकन् हसू येतं. टप्पोरकळी टचकन् फुटावी. तसं.
 समोर पाळणा फिरतोय. आणि त्या पाळण्यातून वरखाली गरगरणारी माणसंही. आईस्क्रीमचा कोन चोखत झिंग येईस्तो गरगरत राहायचं. तो तिला आग्रह करतो. ती वरवर नको म्हणते.
 'इतक्या दूर आल्यावर. लातुरातली धुळवट राप टाकून दे की ! ' तो चक्क तिचा दंड घट्ट धरतो आणि चक्राकडे धावू लागतो.
 दवबिंदू डंवरून यावेत तसा कपाळावर. घाम. रक्तारक्तातून विलक्षण थरथर. अवघा देह सतारीगत झणाणणारा.

४८ /स्वरांत