पान:स्वरांत.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एक क्षण असा आला, तिथून मागची वाट तुटली होती. मग मॅनेजर सांगेल तिला खास संगत द्यायची. तिला तृप्त करायचं.
 माझा कोवळा दुधाळ रंग ... दणकट बांधा नि गाभुळे हळवे डोळे अनेकजणींना हवेसे वाटायचे.
 खूप पैसा मिळायचा. कधीतरी घरी जायचो. दादावहिनींचा हळूवार संसार पाहून पैसा खुपायला लागायचा. आपण संपलो असल्याची जाणीव चिरत जायची.
 खरं तर लग्न करायला नको होतं ...
 लग्न ... तो एक खुळा सूड होता. दादा - वहिनींच्या संसारावर उगवलेला. तू नकळत बळी गेलीस. कुरूप बाईला मन नसतं असा माझा निखालस समज तो खोटा ठरला. तुझं कोवळं मन मला दिसायचं नि ते हवंसंही वाटायचं. तू माझ्या संसारात स्वत:ला मुरवून घेत होतीस. तुझं ते विर्घळणं पाहून मी हादरून जात होतो.
 तुझं अस्तित्व मला माझ्या पापांची दहशत घालीत होतं.
 मी हा असा आहे.
 नकळत जाळ्यात सापडलेला असहाय किडा. या जाळ्याचे रसतंतू इतके जिवंत आहेत की सजीव सुटून येणं कठीण. तरीही शपथपूर्वक सांगतो, माझं मन तुझ्यात गुंतलंय. माझं अपवित्र शरीर ... पण तृप्त घरकुलाचं स्वप्न तू मला क्षणभर का होईना, देऊ केलं होतंस.
 तुझ्या निष्ठेनं भाजून निघतोय मी.

३६ /स्वरांत