पान:स्वरांत.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५-७-७३

 गेल्या काही दिवसांत खूप दूऽऽ र चालून आलेय मी. पण कुणापासून दूर?
 कधी कुणाच्या जवळ होते मी?
 कित्येक तासांत संभाषण नाही. शब्दांचं अस्तित्व संपून गेलंय ... अनंत केविलवाणेपणानं इकडेतिकडे करतात.
 त्यांची ती नजर पाहिली की मन पेटून उठतं. सगळ ढोंग आहे. घरातून निघून जायला पाय ओढताहेत.
 कुठं जाऊ पण ? कुणाच्या घरी ? हातातल्या अगदी भेंडोळ्याला फक्त कागदाचीच किंमत आहे.
 याउबंरठ्यापलीकडे काय आहे माझं ?

२६-७-७३

 दुपारच्या टपालानं अनंतचं पत्र आलं आहे.
 एका घरात राहून पोस्टानं पत्र पाठवण्याची वेळ यावी ?
 दुर्गा,
 तुला प्रिय म्हणण्याचा अधिकार लग्नापूर्वीच मी गमावला आहे. डिग्रीचं भेंडोळं घेऊन या महानगरीत आलो. साथीला होती स्वप्नांची आरास. प्रत्येक नकारासोबत विझत जाणारी.
 डिग्री नाही, तर माझं देखणं रूप कामाला आलं.
 एका अलिशान हॉटेलात रिसेप्शनिस्टची नोकरी. सुंदर कपडे ... खळाळतं जीवन. दिमाखदार नट्या. मलईदार बायका; बड्या उद्योगपतींच्या. नेहेमी यायच्या. त्यांना कंपनी द्यायची. पहिल्यांदा नुस्ती कंपनी. पुढेपुढे त्या मागतील ते.

एका गांधारीच्या डायरीतली काही पाने / ३५