पान:स्वरांत.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिलं. मी यांच्याकडे हळूचं पाहिलं. त्यांचा चेहरा निर्विकार होता... कोरा करकरीत...आज पहिली भेट. मन धास्तावलंय. घरात ना सासू ना नणंद. जाऊबाई परस्पर गावी गेल्या. आनंदाच्या क्षणी सुद्धा आधार हवासा वाटतो मनाला.

१८-७-७१

 वैवाहिक जीवनाची किती मोहक चित्र रेखाटली होती मी ! माझ्या रूपावर नाराज असतील अनंत ?
 खूप बोलावसं वाटतं... विचारावसं वाटतं; पण त्यांचे ओठ सदा मिटलेले. स्वभावच असावा तसा.
 पुरुष खूप अधीर असतात म्हणे! मिनी... शमी काहीबाही सांगायच्या. अनंत कसे इतके शांत ?
 वेगवान वादळं दौडत यावीत आणि त्यात केव्हा वाहून जावं ते उमजूच नये... असा अनुभव, पण वादळं आलीच नाहीत.
 चंद्रज्योतीची फुलं. उंच... उंच उडावीत नि ऐन क्षणी विझून जावीत तसे अनुभव !
 शेजारी अनंत शांत झोपलेले. मी जागीच. धुमसत्या राखेसारखी.

२५-८-७१

 आसपास ओळखी होऊ लागल्या आहेत. आम्ही दोघं जवळ यायला लागलो आहोत.
 मी आज विचारलं, 'माझ्यासारखी काळी मैना कशी पसंत केलीत ?' ते गोडसं हसले नि म्हणाले, 'कुणापाशी तरी

एका गांधारीच्या डायरीतली काही पाने / २९