पान:स्वरांत.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८-५-७१

 त्या मुंबईकरानं चक्क पसंत केलंय मला.
 तो सोन्यासारख्या झळझळीत रंगाचा, मी अशी सावळी तुळस. उभार बांधा नि दाट रेशमी केस. हीच जमेची बाजू.
 बरं झालं. आजी मोकळी झाली.
 भावाच्या संसारात ती नि मी अडचणच आहोत.

२५-५-७१

 रूढी किती सुंदर असतात !
 दाखवून घेण्यातल्या साऱ्या यातना आता विझून गेल्या आहेत. दहा दिवसांनी लग्न. हे. दहा दिवस युगासारखेच भासताहेत. माझं घर ! माझ्या एकटीचं... फक्त माझंच असलेलं एक नवं धन !
 माझ्या स्वप्नांना प्राण देणारे फक्त माझे अनंत !
 नावगाव सगळं पुसून नवं रूप घेणारेय मी. राखेतून नव्या क्षितिजाकडे झेपावणाऱ्या फिनिक्स पक्षाचे पंख मला फुटणार आहेत.
 मी सुंदर होणारेय्...

६-६-७१

 केवढी प्रचंड आहे मुंबई ! घनदाट अरण्यात वाट चुकून जावी तसं मन भेदरून गेलंय. लग्नानंतरचा प्रसंग सारखा आठवतो आहे. नाव ठेवायच्या वेळी वाटलं होतं की सुरेखसं नाव मिळेल. दुर्गा या नावाची शिसारी वाटते मला, बैंगणी मळकट लुगड्याच्या रंगाचं नाव, पण 'दुर्गा' नावच ताटात.

२८ /स्वरांत