पान:स्वरांत.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




एका गांधारीच्या डायरीतली काही पाने


३-५-७१

 आज मुंबईचे पाहुणे पाहून गेले. गेली दोन वर्ष हा बाजार दर पंधरा दिवसांनी भरत असतो. याही वेळी माल नापसंत पडणार... हे असं दाखवून घेताना, प्रत्येकासमोर गुळचिट् हसताना मनात येतं, दर संध्याकाळी वेश्या हेच करतात. हसायचं नि सावज पकडायचं.
 स्वतःची विलक्षण घृणा येते. मी पदवीधर आहे; पण माझ्यात नि माझ्या आजीत कोणता फरक पडला? आजीही दहा ठिकाणी दाखविली गेली असेल. मग सौदा... आणि शेवटी वंशासाठी दिवा लावणं वगैरे...
 मनातले विचार मनातच रिचवावे लागतात. सुंदर असते तर हा पिंजरा तोडून भरार होण्याची ताकद मनाला मिळाली असती. श्यामल कर्णीकनं आईबापाच्या नाकावर टिचून पंजाब्याशी लग्न केलंय. तिच्या आईला कायस्थपणाचा केवढा अभिमान ! रूप नडतं आमचं. शेवटी याच रस्त्यानं मार्गी लागायची आमची गाडी.