पान:स्वरांत.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यावेत तशी. मग दोन तपकिरी डोळे चुकवणं अशक्य होऊ लागलं. त्या दोन डोळ्यांनी मला दिलेला विश्वास, स्वप्नांचे कोवळे कोंभ ... सारं आठवू लागलं. प्रतारणेच्या पापानं आतल्या आत जळणाऱ्या मला एकाच प्रायश्चित्ताचा ध्यास लागला. त्या दोन डोळ्यांना भेटण्याचा.
 तुला पत्र लिहिलं.
 तुझं उत्तर आलं.
 तुझा पत्ता जुनाच होता. नावही तेच, न बदललेलंल. मी पराभूत झालो होतो. डंख सोसूनही तू उभीच होतीस.
 मरण नाकारता येत नाही तशा वेदनाही नाकारता येत नाहीत.
 त्या कुरवाळाव्याच लागतात. दुखऱ्या हातांनी त्या कुरवाळतानाच कधीतरी, नकळत
 त्यांच्यावर प्रेम करायला लागतो आपण !
 वेदनांच्या वळांचा जांभळा धुंद थर आयुष्यावर चढत जातो.
 त्या थराखाली भूतभविष्यवर्तमान सारेच गाडले जातात. तो थर कुरतडून काढण्याचं ... नव्या आभाळाखाली जाण्याचं बळ, बळी गेलेल्या मनात कधीच येत नाही. एकच गोष्ट फक्त हातात उरते. आपली इमेज आपणच जपत राहणं.
 तू स्टेटस्मध्ये सेटल झाल्यावर दोन वर्षांनी अनिलनं मला विचारलं होतं.
 तुझ्या माझ्या प्रेमाचा मनस्वी साक्षीदार तो.
 तू केलेल्या प्रतारणेचं प्रायश्चित्त घेण्याच्या त्याच्या उदात्त कल्पनांना बळी जाणं मला नको होतं.

शेष प्रश्न / २१