पान:स्वरांत.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ते कोवळं बाळ सारखं दिसतं. मला का नको बाळ ? हलत्या पाखरांसारखे त्याचे गुवरे गाल. गुलाबाच्या पाकळीसारखे तळवे. जवळ घेताना किती छान वाटत असेल!
 मला बाळ का नको?
 मला हवंय.
 मी कुरूप. काळी.
 म्हणून लग्न नाही.
 आणि म्हणून बाळ पण नाही.
 का?
 असं का?
 माझा रंग नको असेल कुणाला. पण माझ्या बाळाभोवती कुंपण का?
 कुंपण का?

* * *

 सिंडरेलाला त्या राजपुत्रानं हाकलून दिलं म्हणे! मग सिंडरेला पुन्हा शिळीपाकी झाली. कळकट, तेलकट, झिपऱ्यांचं टोपलं.
 अशी कुठं राणी असते?
 मग राजपुत्र म्हणाला, 'ए भिकारडे ! निकल जाव यहाँसे. अभी के अभी.'

* * *

 उषाचं बाळ घरभर रांगतं. मातीचे पोपडे उकरून खातं. दात येताहेत त्याला. काल खूपदा शी पण केली. उषा नर्व्हस आहे आज. त्याला कॅलशियम द्यायला हवं. कॅलशियम डेफिशियन्सी असली की मुलं माती खातात. केळं खायला

स्वरांत/१५