पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
करंज्यातला मोदक

नरनारीसंगम हीच संस्कृती बाई ।

विश्वांत ऐकले कुठेच नाही काही -२
कां वदे करंजी मोदक कोठे गेला ?
कां पोळ्या म्हणती करा बघू कानवला !
कां लाटीवांचुन पापड करि रुदनाला !
मज नको वाटते कुणास शिकवायाला !
 “किती हिंदकन्यका वेड्या ! ह्या म्हणा,"
 ह्या किती पावल्या थोड्या शिक्षणा"
 ह्या करवी रचवी माड्या कल्पना;"
जगिं राहूं वेड्या अशाच आम्ही बाई!

करुं वेड्या इतरां ! यांत न सशय कांहीं-३

 मी पापड लाटीत होते व दत्तू जातां येतां लाट्या लाटति होता. शेवटीं सर्व पापड लाटून झाल्यावर एक लाटी उरली. त्याचा तिच्यावर डोळा होता. मी ती त्याला घेऊ देईना.तेव्हां त्याला हा सर्व शास्त्रार्थ सांगितला व ही कविता झाली. अर्थात हिच्यावर टिळकांचा सफाईदार हात फिरलेला आहेच. ही कविता प्रासिद्ध झाल्यानंतर मला पंढरपूरहून एका बाईंचे पत्र आले; त्यांत असा प्रश्न केला होता की -
 मोदक बहु गोड असे आकारहि सुबक साधला बाई !
 तव भर्त्याचे त्याला साह्य नसे का कथीं मला ताई ?
ही कविता वाचल्यावर मला प्रथम टिळकांचा मोठा राग आला. हे मला उगीचच प्रसिद्धी देत बसतात नि माझी अशी फजिती होते! पण माझ्या त्या कोपाग्नीची आंच लागण्यास टिळक मजजवळ होते कोठे ? दूर कोठे तरी बसून आपण एक महाकाव्य लिहावे असे त्यांनी ठराविले होते व ते नुकतेच वाईजवळ भुइंज येथं जाऊन ख्रिस्तायन लिहूं लागले होते.
 मला कवितेने भंडावून सोडले. पंढरपूरच्या पत्राला कवितेत उत्तर देण्याचे माझ्या मनाने घेतले व माझी सर्वांत मोठी प्रसिद्ध झालेली कविता पतिपत्नि ही मी त्यावेळी लिहिली. ही कविता विशेषतः रात्री अंधारांत सुचायाची.