पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
माझे व्याही जावयी

सारें. चहाची हुक्की आली म्हणजे पडल्या पडल्या नळ तोंडांत सोडून देत जा. मी तुमच्या पुढे पुढे करणार नाही."
“आजपासून तुम्हांला घरांतले सारे काम केले पाहिजे. मीच आतां पाहुण्यासारखी वागणार आहे. कारण मी काही केले तरी तुमच्या मनांत येत नाही.
 वड्या वांग्याच्या भाजीत तुम्हाला मटणाचे तुकडे दिसतात आणि लसणाच्या चटणीचा तुम्हाला बोंबलासारखा वास येतो. मला वाटते तुम्ही मुळी ब्राह्मणच नाही. कारण ह्या जिनसांचा संशयच ब्राह्मणाला येणार नाही. ह्यांची चव घेणाऱ्यापैकी तुम्ही कोणी तरी असला पाहिजे.
तुमचा असा समज झालेला दिसतो की आम्ही वाटेल ते खातों व दुसरा असा समज दिसतो, की आपण सांगू तें टिळक ऐकतात. पण तुम्ही अजून टिळकांना ओळखले नाही. जर का ते रागावले तर तुमची हड्डा. मोकळी करतील.”
 माझ्या ह्या दत्तक चिरंजीवांना एवढी गोळी प्रमाणाबाहेर लागू पडली. त्याने चटकन् माझे पाय धरले.
 “लक्ष्मीबाई पायां पडतो. आतां माझी माफी करा."
 आणि तेव्हापासून तो खरोखरच घरच्यासारखा वागू लागला. पुढे त्याला चांगले काम लागले. टिळकांनी त्याचा बाप्तिस्मा केला. त्याचे लग्नाहि लावले. त्याच्या बायकोचे बाळंतपण मी केले. त्याला बायको फार सुशील मिळाली व मुलेबाळेहि गुणी निघाली.