पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
माझे व्याही जावयी

दिवशा त्यांनी दाराला कुलूप घातले. टिळक बाहेर गेले होते. लाकडे नाहीत ! तो बसला दाराशी भांडत. अन् कुलूप उघडू देईना. तो म्हणे तुम्ही मला मुलगा म्हणता आणि किती पक्षपात करतां! दत्तला कपडे अन् बूट किती तरी आहेत. मला काही नाही.
 "अरे बाबा त्याला शाळेला जायचे असते, तू तसा जा मग तुलाही मिळतील तसे कपडे." "ते काही नाही. त्याला नवा बूट आणला तसा मला आणायला पाहिजे. असें कोठे असतात का आई बाप ?"
 "मुळीच नाही. असें आईबाप मुळीच नसतात. आणि असे चिरंजीवहि कोठे नसतात. दत्तूच्या मी उद्या तोंडांत मारली तर तो मला एक शब्द उलटून बोलणार नाही आणि तुम्ही मलाच एक शब्द तोंडावाट काढू देत नाही. नुसतें हूं म्हटले की तुमचा अपमान होतो. चांगले इंग्रजी सातवी इयत्ता झाली म्हणतां आणि इतके कसे ज्ञान नाहीं तुम्हांला. चला द्या किल्ली.'
 “मी देत नाही किल्ली. मी तुम्हांला ओळखत नाही."
 "बरें तर मीहि तुम्हांला ओळखत नाही. तुम्ही जवायला येऊ नका."
 “मी जेवायला येणार नाही. माझें जेवण येथेच मिळेल."
 “बरें पहातें कसें जेवण येथेच मिळते तें !"
 "पहा."
 टिळक घरी आल्यावर त्यांच्या कानांवर सर्व कागाळया गेल्या. तो टिळकांना म्हणाला,  "तुमच्याकडे पाहून मी गय केली. असला अपमान मी कोणाचाहि सहन केला नसता. मी आपल्या आईला सुद्धा जोड्याने मारले असते मग ह्यांची काय कथा !"
 टिळकांना त्या दिवशी मुंबईस जायचे होते. त्यांनी त्याला मुंबईची तयारी करायला सांगितली. तेथे कोठे तरी सोय लावून देण्याचे त्यांनी ठरविले.
 चिरंजीवांनी आपले कपडे बिछाना सारे काही-जे आम्ही केले होते अर्थात् -तेंच-सारे लोकांना वाटून टाकले. रात्री बाराच्या गाडीने जायचे होते. पण फंडांत पैसे नव्हते. पगाराची बँक बंद झाली होती.! झाडून सारे पैसे