पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५
राणूला उठवा!

वड्यावांग्याची भाजी असली, की त्याने म्हणावें मटण आहे व जेवतांना उठून जावें. जवसाची चटणी वाढली, की त्याने म्हणावें बोंबलाची चटणी आहे आणि ताट बाजूस सारावें. मग टिळकांनी त्याला चार सहा आणे द्यावे व त्याने बाजारांत जाऊन कांही खाऊन यावे. पुढे पुढें टिळक म्हणत ह्याला माझ्या हापीसांत माझ्या देखत जेवायला वाढ. मी तें कबूल करून त्याला त्यांच्या हापीसांत वाढू लागले. त्याला दिवसांतून कमीत कमी पांच सहा वेळेस चहा लागे. तोहि मी देई. शिवाय टिळकांकडून पैसे घेऊन तो बाहेरून चहा पिऊन येई तो निराळाच. टिळक आपल्या पगाराच्या खजिन्यांतून - डॉ. ह्यूमसाहेबांकडून - पैसे आणून अशांची भरती करीत. एखादे वळेस डॉ. ह्यूमहि पैसे देत नसत कारण टिळकांनी बहतेक सारा पगार आगाऊ आणलेला असे. मग गूपचूप रद्दी विकून ते पैसे ते ह्या अतिथींसाठी खर्च करीत. सात आठ दिवसांची सारी वर्तमानपत्रे विकलीं, की सहज चार सहा आणे येत.
 असो हे नवीन चिरंजीव आतिशय भित्रे होते. आमची घरे सारी बिनभाड्याची होती; ती म्हणजे एक एक ब्लॉक मिळून तीन ब्लॉकची चाळच होती. त्यांतील एका ब्लॉकमध्ये मागल्या खोलीत ह्या चिरंजीवांची व्यवस्था करण्यांत आली होती. तिच्या पलिकडच्या खोलीत लांकडे सांठवून ठेविली होती. ती जाऊन आणण्याचे कामदारांच्या जिवावर येई. कारण एक तर चिरंजीव आल्यावर तींत घाण येऊ लागली होती व आंत शिरतांच पाय रपरप भिजत. ह्यांनी तेथे दारांतच मोरी केली होती व त्या मोरीचा नळ लाकडांखाली गेला होता.
 टिळकांना सांगितले, की ते म्हणत तुम्हांला माणूस खपत नाही. आतां काय करावें मोठी पंचाईत झाली होती. शेवटी एक दिवस मी त्याला म्हणालें!
 "दादा तुम्हाला रात्री भय वाटते तर राणूला उठवीत जा. तो तुमच्या जवळच निजतो. जवळ कंदील जळत असतो तो नेत जा. पण हा काय आळस ? आणि पुन्हां जर काही झाले, की तुम्ही वर चहाड्या करायला तयार!"
 माझ्या ह्या बोलण्याने दादा संतापले. त्यांचा अपमान झाला. दुसऱ्या