पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४४
माझे व्याही जावयी

 "पहा महाराज, एक गरीब बाई आहे. तिला दोन मुली आहेत. त्यांची शिकण्याची फार इच्छा आहे. मी आजपर्यंत तिचे बरेंच सहाय्य केलें. आतां मी त्या मुली एका संस्थेत ठेवल्या आहेत. मुली फारच हुशार आहेत. ह्या दोघींना कमीत कमी पन्नास रुपये महिना खर्च येतो. मी दहा रुपयांची व्यवस्था केली आहे. आतां तुम्ही चाळीस रुपये महिना द्या. दोन मुलांची इंग्लंड अमेरिकेच्या प्रवासाची व खर्चाची तुम्हांला सोय करता येते, तर तीन मुले आहेत असे समजा व एवढे कराच."
 टिळक म्हणाले. बुवा दोन मुलांच्याच शिक्षणाची मला पंचाईत पडली आहे तर मी आणखी कशी व्यवस्था करूं ? त्या मुलीला इकडे पाहिजे तर आणून ठेवा. मग काही तरी सोय पाहता येईल. पण पैसे उचलून द्यायला मजजवळच नाहींत.
 पण मला नकोच आहे कांही! मी त्या मुलींचा पत्ता देतो. त्यांना परस्पर पाठवीत जा. दोन मुलांचा खर्च जर तुम्हांला करवतो तर आणखी एकीचा करायला काय हरकत आहे ? नाही तर चाळीस रुपये दरमहा व्याज मिळेल इतकी रक्कम त्यांच्या नावे करून द्या।'
 पुढे बोवासाहेब निराश होऊन गेले ते टिळकांच्यानंतर १९२० साली मला मुद्दाम भेटायाला आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर पगडी होती आणि त्यांनी त्या दोन मुलींपैकी एकीशी लग्न केले असून त्यांना दोन चार मुलांचे पितृत्वहि प्राप्त झाले होतें ! लोकमान्य टिळकांनी आपल लग्न लावून दिले असे त्यांनी सांगितले. खरे खोटें देव जाणे.

 एकदां मुंबईच्या स्टेशनवर टिळकांना एक तरुण ब्राह्मण आढळला. ह्याला कोणी नव्हतें. बुद्धि चलाख असून बाकी अवतार मात्र भडभुंजालाहि लाजविण्यासारखा होता. टिळकांनी बाबाला घरी आणला व माझ्या स्वाधीन केला. त्याचे जानवे काळभैरवाच्या गंड्यासारखे दिसत होते; ना विडीच्या धुराने दांत काळेकिट्ट पडले होते, साऱ्या अंगाला खरूज होती; मी पाणी तापवून कामदारांकडून ह्या अवताराला चांगला घासूनपूसून लख्ख केला. नंतर टिळकांचे कपडे घालायला दिले व त्याला स्वरूप आणले. टिळक ह्याचे फारच लाड करीत. तो त्यांना पपा व मला ममा म्हणे। तो ब्राह्मण आम्ही ख्रिस्ती ! जेवतांना त्याच्या मनांत नाना कल्पना येत.