पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३
अश्रू डोळ्याच्या कोपऱ्यांतून

कंठ दाटून येई. डोळ्यांतून अश्रुधारा वहात.
 टिळक मला म्हणत हा माणूस काही साधा नाही. हा पुढे पौल पेत्रस ह्यांच्या पंक्तिला बसण्यासारखा ख्रिस्तशिष्य होईल. कारण त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळतात ते डोळ्यांच्या कानाच्या बाजूच्या कोपऱ्याने गळतात. खऱ्या भक्तिभावाचे व प्रेमाचे हे लक्षण आहे. बेबिहि म्हणे खरंच आई; त्याच्या डोळ्यांतून पाणी येते ते डोळ्याच्या बाहेरच्या कोपऱ्यातून बाहेर पडते. आणि मी देखील पपा म्हणतात तसे कोठे वाचले आहे. पण मला काही ह्यांचे बोलणे पटत नसे. मला पुराणिकबोवांच्या गोष्टीची व बोकड हारवलेल्या रडणाऱ्या धनगराची आठवण होई.
 बोवा येथेच थांबले नाहीत. त्यांनी हळू हळू आमच्याप्रमाणे घरांत कामें करण्यास सुरवात केली. कधी अपशब्द नाही, कधी धुसफूस नाही. अत्यंत सालस गरीब व प्रेमळ गृहस्थ होता तो. टिळकांबरोबर म्हशी धुणे, वळायाला नेणे, वगैरे सारे अगदी घराच्या माणसाप्रमाणे तो करी. टिळकांची सेवा तर तो अगदी मन लावून करी. अगदी एखाद्या जुन्या शिष्याने गुरुगृहीं करावी तशी.
 पुष्कळांचा असा समज असतो, की कोणी ख्रिस्ती झाला, की त्याला खूप पैसा मिळतो. पण ख्रिस्ती झाल्यामुळे पैसा मिळाल्याचे मला एकहि उदाहरण ठाऊक नाही. मिशनरी किंवा ख्रिस्ती लोक गरीबांना सहाय्य करतात त्याचा हा असा अर्थ करण्यांत येतो. पण सहाय्य करणे हा ख्रिस्ती धर्माचा एक महत्वाचा भाग आहे.
 आमच्या बोवांचहि असाच समज होता. एक दिवस संध्याकाळची प्रार्थना झाल्यावर बोवांनी हळूच चौकशी करण्यास सुरवात केली.
 “आपल्याला किती मुले आहेत ?"
 "तुम्हाला माहीतच आहे."
 "त्यांची विद्या आपण कोठवर करणार ?"
 “शिकतील तितकी!"
 "पण कांहीं बेत ठरला असेल ना?"
 " बी. ए. पर्यंत किंवा पाहिजे तर इंग्लंड अमरिकेला जातील."

 बुवांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी हळूच पिल्लू सोडून दिले.