पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
मा झे व्या ही जा व यी

वळणच लावले नाही. बेबीवरून तर रोज कुरबूर होई. टिळक त्याची समजूत घालीत पण त्याचेच आपलें खरें. एक टिळक मुलीला रागें भरले म्हणजे त्याचे समाधान होई. एक दिवस टिळक कशालासे गांवाला गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत आमचा गोपा साठे-मास्तर-आला होता. त्याला जडीबुट्टीची फार चांगली माहिती होती. अर्धांगवायुवरहि त्याच्याजवळ औषध होते! मी म्हटले गोपा तूं जा ह्याला तुझ्या गांवीं घेऊन. औषध, वैद्य आणि रोगी एकाच गांवी असले म्हणजे बरें. मी त्याला खर्चाला पांच रुपये दिले व ते दोघे गेले. टिळक परत आल्यावर त्यांच्याच गाडीने गोपाजीचे पत्र आले, की आमचा पेशंट पळून गेला! टिळकांना त्याच्याविषयों फार वाईट वाटले.
 हे पात्र गेल्यानंतर दुसऱ्याने प्रवेश केला. आपला सकाळचा चहा नित्याप्रमाणे आपल्या हातांनी करून घेऊन व घरांतील सर्व चहाबाजांना अंथरुणांतून उठवून तो पाजल्यावर टिळक बाहेर येऊन उभे राहिले तों त्यांच्यापुढे एक लांब रुंद व्यक्ति दत्त म्हणून उभी ! वर्ण निमगोरा,बसकट तोंड, घारे डोळे, चेहरा रुंद, डोक्यावर जटांचा मुगुट, संन्याशाच्या डोक्याप्रमाणे ओठ व हनुवटी गुळगुळीत, अंगांत घोट्यापर्यंत भगवी कफनी, डोक्याला भगवा फेटा, हातांत भगव्या छाटीचे एक लहान गांठोडे अशा थाटांत टिळकांच्यापुढे उभे राहून आपणच का टिळक म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला.
"हो मीच टिळक." हे टिळकांच्या तोंडाचे शब्द कानी पडतांच त्याने आपल्या हतांतील गांठोडे खाली ठेवून त्यांतून एक भला मोठा फुलांचा हार बाहेर काढला व तो टिळकांच्या गळ्यांत घातला. “मी आज धन्य झालो. माझ्या जन्माचे सार्थक झालें."
माळ काढीत टिळक म्हणाले “बुवा माझ्या पायां नका पडूं, सारा मान माहिमा ख्रिस्ताचा आहे. मी काय यःकश्चित् प्राणी."
 बुवा आमच्या घरी राहूं लागले. टिळकांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी चातकाप्रमाणे टपून बसू लागले. टिळकांचे त्यांच्यावर फारच प्रेम बसले. ते दोघे कधी एकमेकांपासून दूर होत नसत, टिळक यांना ख्रिस्तीधर्माविषयी सांगत) बुवा लक्ष्य लावून ऐकत. ऐकता ऐकतां त्यांचा