पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
नगरांतील ते दिवस

अशी काही तरी वेळ मारून मी घरी आले. टिळक आपल्या चहाच्या प्रकरणांत त्यावळी गुंग होते.
"काय कसे काय झाले तुझें लेक्चर ? कोणता विषय घेतला होतास?"
“ वा आजचा विषय तर फार बहारीचा होता।"
"कोणता?"
"बायका आपल्या नवऱ्यांना कां मारतात ? त्यांनी तसे करणे बरे किंवा वाईट?"
"म्हणजे तूं काय बरळते आहेस?"
"बरळत नाही. खरंच माझा हा आजचा विषय होता.”
मग ते काय म्हणाले?"
"ते म्हणाले तरीच गुरुजी सांगत होते, की गुरुमाउली आपल्याला मारतात म्हणून,"
"मग तूं काय बोललीस?"
"मी? खरें होतें तें सांगितलें ?"
"काय?"
"मी सांगितले की ज्या ज्या वेळेस ते माझें ऐकत नाहीत, पैसा नाहीसा करतात, विनाकारण संतापतात, कधी वेळेवर घरी येत नाहीत, त्या त्या वेळी मी त्यांना चांगला ठोक देते,"
टिळकांना माझें सारे बोलणे खरे वाटले. ते म्हणाले.
"मी तुला फार शहाणी समजत होतो. पण आज माझी खात्री झाली, की तूं फार मूर्ख आहेस. एखाद्या वेळेस तूं माझी अब घालविशील!