पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९
गुरुजींना तुम्ही मारतां?

मंजुळाबाई आली. हा कपड्याचा ढिगार पाहून ती थक्कच झाली.
“ मंजुळाबाई ! काय तुम्ही माणसें असून उपयोग ? भाजी करायची की काय तुमची ? माझी टोपी आत्तांच्या आत्ता शोधून काढा.
" पण पपा त्या ढिगाराखाली असेल ती-"
पण ह्यानंतर कोणी बोलणेच अशक्य होतें. मंजुळाबाई टोपी शोधायाला यांच्या ऑफीसमध्ये जाऊन बसली ती खिडकीतून तिला टिळक तसे व निघून गेलेले दिसल्यावर खाली आली. टिळक गेल्यावर आम्ही ते कपडे उचलले तेव्हां साऱ्या ढिगाखाली कोटांत अडकलेली टोपी सांपडली! टिळकांना हे कळले तेव्हां ते म्हणाले खरंच की मी काल कोटाखाली ठेवली होती टोपी.
एखादे वेळेस टिळक आपल्या क्लासांत शिकविण्यासाठी मला पाठवीत. अगदी पहिल्यांनदा जेव्हां मी क्लास घेण्यास गेले तेव्हांची एक गमतीची आठवण होते. ते म्हणालें तूं जाऊन माझा क्लास घे. मी म्हणाले " मी काय त्यांना लोणची कशी घालायची, मेतकूट कसे करायाचे हे शिकवू?" " नाहीं ग. हिंदु चाली रीतीसंबंधी त्यांना काही सांग. म्हणजे झाले.” क्लासांत तीस चाळीस विद्यार्थी होते. हे विद्यार्थी म्हणजे लहान लहान मुलें नसत तर आमच्या एवढालींच मोठी माणसे असत. मला पहातांच विद्यार्थ्यांनी माझं स्वागत केले. “का गुरुमाउली आज तुम्हीं शिकविणार का काय आम्हांला ?" “हो, मी तुमच्या गुरुजींच्या बदली आले आहे आज." मी काही तरी पोपटपंची करून त्यांना त्या वेळेस शिकविलें तर खरें. माझें लेक्चर संपतांच एकजण म्हणाला. “गुरुमाउली, एक विचारूं का ? " हो खुशाल विचारा.” “आमच्या गुरुजींना तुम्ही मारतां असे ते म्हणत होत हे खरें का?" "तसे कधी होईल का ? बोलण्याच्या भरांत त्यांनी तुम्हांला काही तरी सांगितले असेल. बायका कधी आपल्या नवऱ्यांना मारतात का ? (आतां शहाण्याला शब्दाचा मार त्या अर्थाने मारते कधी कधी त्यांना)"