पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
नगरांतील ते दिवस

हें सामान वेंचून घेऊन जा. त्यांना काय ? त्यांनी सारे मोठ्या आनंदाने गोळा करून नेले!

 टिळकांच्या चीजवस्ता नेहमी हरवत. हरवत म्हणजे काय तर ते स्वतः ठरल्या ठिकाणी त्या ठेवीत नसत, ठेवल्या ठिकाणी पहात नसत व स्वतः बरोबर दुसऱ्यालाहि पाहू देत नसत. दांत, आगपेटी, टोपी, चष्मा, पट्टा ह्या चार पांच जिनसा नेहमीच त्यांच्या हतांतून निसटत. विशेषतः क्लासला जायच्या वेळस किंवा एखाद्या गांवाला किंवा लेक्चरला निघायाच्या वेळेस बूट, कोट, मोजे, टोपी, कॉलर, पट्टा, छत्री, वहाणा ही सारी त्यांच्याशी लपंडाव खेळत व त्यांच्याबरोबर आमच्याहि साऱ्यांच्या फुगड्या सुरू होत. कित्येक वेळेस त्यांना टोपीवांचून जावे लागें, नाहीतर पट्ट्या ऐवजी पारडूं सोडून त्याचेच दोरखंड कमरेला गुंढाळावे लागे. माझी व्यवस्था कोणीच ठेवित नाही. जे ते आपल्याच व्यवसायांत दंग माझी कोणाला पर्वाच नाही. असे ते म्हणत आणि मग आम्ही सर्वच त्यांची पर्वा करण्यास धावून येत असुं एकदा असेच दांत हरवले. केवढा गोंधळ ! म्हणे ह्या कुत्र्यानेच माझे दांत लांबविले. नाहीतर ह्या खोलीत तूं खंडीभर सरपण सांठवून ठेवले आहेस त्याच्याच खाली उंदरांनी ते नेऊन टाकले. उपसा रे ते सारे सरपण आणि द्या बाहेर फेंकून. हिला संसाराचा फार आटाट. झालें-सारे सरपण बाहेर कंपाउंडभर धावू लागले आणि त्याच वेळेस दांतांचा डबा सांपडला टेबलावर! एकदां हरवली टोपी. ती होती खुंटीवर व तिच्यावर ठेवला होता कोट. टिळकांना जायचे होते बाहेर. त्यांनों गडबडीत दुसराच कोट अंगात घातला व ते टोपी शोधू लागले. प्रथम त्यांनी पहिला कोट रागानें जमिनिवर खाली आपटला. त्याबरोबर त्याच्या खालची टोपीहि तशीच खाली आदळली. मग काय? सर्पयज्ञांत सर्पांचा वेटोळीची वेटोळी येऊन अग्निकुंडांत पडू लागली तशी आमच्या घरांतील कपड्याच्या चुंभळी भराभर त्या ढिगाऱ्यावर येऊन पडू लागल्या. बिछाने, सतरंज्या, ब्लँकिट झाडून सारी मंडळी त्या ढिगारांत गोळा झाली.
 “जा जा त्या मंजूळाबाईला बोलवा! काय करते ती? माझी टोपी शोधून काढा."