पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७
दीड आहे

 ह्या वेळेस टिळक सोंगट्या फार खेळत व ह्या सोंगट्यावरून सप्पाटून भांडणे होत.टिळक कवड्या जुळवून टाकीत,त्यामुळे त्यांच्याशी पुढे खेळण्याचेहि सर्वांनी सोडून दिले होते.मग ते एकटेंच रागारागाने खेळायाला बसत. एक डाव उजव्या हाताने खेळत तर दुसरा डाव्या हाताने खेळत. असा त्यांचा नेहमींचा क्रम होऊन बसला. एके दिवस आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी खेळायाचे ठरविले. त्यांनाहि मोठा आनंद झाला. मात्र अट एवढी होती, की कवड्या पाणी प्यायच्या भांड्यांत घालून हालवून मग टाकायच्या. आम्ही खेळायाला बसलो. एका बाजूला टिळक, ठोंबरे आणि तारा तर मी दुसऱ्या बाजूला मी, दत्तू आणि भास्कर कृष्ण उजगरे. पहिल्याच डावाला टिळकांची सरशी झाली. फक्त एकच नरद आंत जायची राहिली होती. तिला दोनच पडायाला हवे होते, मग आमच्यावर बिन तोड झाली असती. आणि जर का दहा पडते तर तिने उलट खाऊन आपल्या शत्रूच्या समोर प्रस्थान ठोकलें असतें व मग मात्र खात्रीने तिच्या प्राणावर बेतली असती. कवड्या हातांनी टाकायाच्या असत्या तर एवढी घास्ती नव्हती. पण त्या पाणी प्यायच्या भांड्यांत घेऊन टाकायाच्या म्हणजे जरा कठीणच काम होतें ! टिळकांनी दान टाकले.त्यांत एक कवडी पडली उताणी व एक पडली कुशीवर! एकीकडून पाहिले तर दोन दिसावें दुसरीकडून पाहिले तर दहा दिसावे. टिळक एकदम ओरडले दोन. तशी आम्ही ओरडलों दहा. ते म्हणत दहा कसे होतील! आम्ही म्हणू दोन कसे होतील. ते जमीनीवर जोरजोरानें बुक्क्या आपटून आमच्या गळी उतरवू लागले, 'मी नारायण वामन टिळक सांगतो, की ते दोन होते' तशी मीहि सांगू लागले, 'दोन कसे, मी लक्ष्मी नारायण टिळक सांगते, ते दहा. शेवटी ते ठोंबऱ्यांना व ताराला विचारूं लागले, काय आहेत रे हे ? ठोंबरे म्हणाले हे दोनहि नाहीत आणि दहाहि नाहीत, दीड आहे! टिळक म्हणाले म्हणजेच दान. आम्ही सारे रागावत होतों व हासतहि होतो. शेवटी पुन्हां टाका डाव असा आम्ही आग्रह धरला. पण टिळकांना पुन्हां डाव टाकायला नको होता. कारण पुन्हां खात्रीने दोनच कशावरून पडतील. शेवटी त्यांनी सोंगट्या, पट, कवड्या ही समोरच्या कंपाउंडांत फेंकून दिली. व वर त्यांच्या मागे धावत जाऊन समोरच्या लोहाराकडे जमलेल्या माणसांना सांगितले