पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
नगरांतील ते दिवस

लिहून देतात कधी आणि आम्ही ते पाठ करून टाकतो कधी. त्यांतल्या त्यांत चहाची गर्दी असायची. मध्ये स्टो, केटली, कपसासर, दूधसाखर, दऊत, कागद, टाक, चमचे, जवळच जमिनीवर ठेवलेला पोपटाचा पिंजरा, मांजर, दारांत कुत्रा आणि ह्या सर्वांभोंवतीं हायस्कूलची मुले. आपल्यासारखा सायंटीफिक चहा कोणाला करता येत नाही अशी त्यांची खात्री असल्याने चहाचे सर्व कंट्राट त्यांच्याचकडे असे. असो एक दिवस नाटकाचें नांव झाल्यानंतर चारसहा दिवसांनी पुढे बसलेल्या मुलांना नाटकांतली नांवें दिली गेलो. तूं बाळासाहेव, तूं रे! तूं पिल्या, तूं देवदत्त. तूं चारुदत्त.
"पण पपा आम्हांला पाठ करायला काही देतां की नाही?"
"अरे मला चहा बिहा तर घेऊ देतां की नाही ?"
“घ्या ना! पण इतक्यांत कोणी आले तर सारेंच राहून जाईल."
मग एक दिवस एकेकाला कांहीं कांहीं पार्ट लिहून द्यावा. दुस-या दिवशी मुलांची पुनः निकड लागली म्हणजे पुन्हां द्यावे अशा रीतीने अगदी ग्यादरिंगच्या वेळेला नाटक लिहून व बसवून पुरे झाले. मुले अगदी अधीर झाली होती. हे पुरे होते, की नाही असे त्यांना वाटे. टिळक म्हणत अरे काळजी कां करतां? होईल पुरें. ती म्हणत आम्ही लिहून घेतो. तुम्ही सांगा. पण तें कांही त्यांच्याने कधी झाले नाही. नाटक इतके सुंदर वठलें, की काही दिवस नगरास तो एक चर्चेचा विषय होऊन राहिला होता.
ह्या नाटकांतील दोन तीन जण पुढे निरनिराळ्या क्षेत्रांत प्रसिद्धीला आले. नाशीकच्या कॉलेजांत आतां प्रोफेसरचे काम करीत असलेले प्रोफेसर भा.ल.पाटणकर* देवदत्त झाले होते.नगरचे रेवरेंड रामकृष्णपंत मोडक,** एम्. एल्. सी. ह्यांचा एक प्रमुख भाग होता. प्रसिद्ध नट रा. पेंढारकर चारुदत्त झाले होते. पेंढारकरांचा आवाज त्यावेळेस अत्यंत मधुर होता व माधवराव पाटणकरांनी त्याच वेळेस टिळकांच्या जवळ उद्गार काढले होते की, हा मुलगा जर पुढे मागे नाटकांत गेला तर नांव काढील. आणि पुढे तसेच झाले.


* आतां हे प्रिन्सिपाल झाले आहेत. * प्रसिद्ध सिनेमा नट
श्री. शाहू मोडक त्यांचे हे वडील.