पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७: नगरांतील ते दिवस

 एकदां कल्याणी म्हैस सुटली व उधळली. टिळक त्या वेळेस “ लेक्चर हॉलमध्य' वर्ग घेत होते. फर्ग्युसन गेटपासून कल्याणीबाईचा दौरा जो निघाला तो लेक्चर हॉलवरून पुढे गेला. शिकवितां शिकवितां टिळकांचे लक्ष्य म्हशीकडे गेले. ते तसेंच वर्ग टाकून बाहेर पडले व म्हशीच्या मागे धावू लागले. कोट, पँट, डोक्यांत हॅट, हातांत एक वेळूची लांब- लचक काठी अशा अवतारांत टिळक तिच्या मागे पळत होते. त्या दिवशी म्हशीने फारच त्रास दिला. ती काही केल्या त्यांचे ऐकेना. शेवटी एक- दांची कशी तरी तिला घरी आणली.
 घरी आल्यावर टिळक म्हणाले, अग म्हशी वळणे सुद्धा सोपें काम नसते. गुराख्याला किती श्रम पडत असतील बिचाऱ्याला. आपण गुरा- ख्याला उद्यांपासून राखोळीचे पैसे दुप्पट द्यायची सुरवात करूं. हे गरीब लोक असतात.बोलत नाहीत म्हणून आपण त्यांना थोडक्या पैशांत राबवून घेतो टिळकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही गुराख्याला जादा राखोळी देऊ लागलो.
 मिशन हायस्कूलमध्ये गॅदरिंग करण्याचे ठरले. गॅदरिंग म्हणजे नाटक आलेच. स्त्रीपार्टाखेरीज नाटक कराल तरच नाटकाला परवानगी मिळेल अशी अट मुलांना घालण्यात आली. पण स्त्रीपार्टीखेरीज नाटक मिळेना. तेव्हां नाटक लिहून देण्याचे टिळकांनी अंगावर घेतले. तसेच ते शिकवा- याचेंहि त्यांनी ठरविले. नाटकाचा प्लॉट वगैरे कांहीं ठरला नव्हता व नाटक लिहिण्यास वेळहि नव्हता लष्करच्या भाकरी भाजण्यांत त्यांचा कितीतरी वेळ खर्च होत असे. पण मुले कसली ती. शाळा सुटली, की येऊनच बसा- यची! पहिल्याच दिवशी नाटकाचे नांव ठेवण्यात आले. शीलं परं भूष- णम्. वेळ रोज पांचच्या पुढचा ठरला. पण प्रेक्टिस कशाची करायची ? मुलांनी येऊन बसावें तो कोणीतरी भेटायला हटकून यावे. मग टिळकांनी त्या पाहुण्याशी बोलत बसावें. कोणी नसले तर काही तरी लिहित बसावें. नाहीतर वाचति बसावें. कधी कधी एखादा गहन विषय काढून मुलां- शीच वादविवाद करूं लागावें. इकडे मुलांना वाटे, की हे आम्हांला नाटक