पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
गोवऱ्यांची भट्टी

आंत येऊन हात वगैरे धुतले. मग बाहेर जाऊन गृहस्थांचे स्वागत केले.
 ह्या म्हशीवरूनहि आमची मधून मधून भांडणे होत. एक दिवस मी म्हटलें, काय करावें, गोवऱ्या वाळत घातल्या, की चोरीस जातात. टिळकांनी विचार करून गोवऱ्या चोरीस न जाण्यालायक एक नामी युक्ती काढली. जवळच दत्तू आणि बेबी बसली होती. टिळक म्हणाले आपण गडी ठेवून त्याच्याकडून ह्या गोवऱ्या भाजवूनच घेत जाऊं, एक मोठे चुलंगण करावे. त्यावर पत्रा ठेवून वर गोवऱ्या भाजून घेतल्या व रचून ठेवल्या म्हणजे झाले काम !
 टिळकांची ही युक्ती ऐकून आम्ही तिघेहि हसू लागलो.
 “ मला तुम्ही सर्वजण इतका का मूर्ख समजतां ? मला कांहींच ज्ञान नाहीं असें तुमचे म्हणणे आहे का ?
 "तुम्हाला पुष्कळ ज्ञान आहे. त्याबद्दल माझा कांहीं वाद नाही. पण माझें एवढेच म्हणणे आहे, की त्या भाजायला खर्च जो येणार तो गोवऱ्याच्या किमतीच्या तिप्पट. शिवाय तापल्या तव्यावर टाकलेली गोवरीची राख होऊन जाणार ती वेगळीच."
 "हे पहा असाच तूं माझा जेथें तेथें पाणउतारा करतेस. काय दत्तू तुला काय वाटते.?"
 “खरेंच पपा ? मलाहि आईप्रमाणेच वाटते, की एवढ्या खर्चात आपल्याला लाकडेंच वापरता येतील.'
 आतां तर टिळक फारच रागावले. त्यांनी मंजूळाबाईला हांक मारून सांगितले, की चूल पेटवून तव्यावर एक गोवरी थापून त्यांना आणून दाखवा. मंजुळाबाई हो म्हणून दुसऱ्या दाराने निघून गेली व टिळक आपल्या कामाला गेल्यावर हे गोवऱ्या प्रकरण विझून गेले.
 एकदां मी ठोंबऱ्यांना सांगितले ठोंबरे पारडाला पाणी पाज बरं. ठोंबऱ्यांनी पाणी पाजले. पाणी पाजल्यावर परत पारडू जागेवर आणून बांधायच्या ऐवजी त्यांच्या मनांत थोडी गंमत करायाचे आले. त्यांनी पारडाच्या दोरखंडाचे एक टोंक दिले आपल्या कंबरेला बांधून. पारडू भारपूर दूध पीत असे त्यामुळे खूप सशक्त झाले होते. ते लागले ठोंबऱ्यांना ओढायला. आणि होतां होतां पारडू पुढे व ठोंबरे मागें असे मार घरा-