पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१
अगदी सालंकृत कन्या दान

झाली असती. टिळकांच्या पोटांत तुटू लागले. पण पोटांत तुटून उपयोग काय ! त्याला द्यायला घरांत काय होते? टिळकांच्या डोळ्यांपुढे घर पुनः नाचूं लागले. पण मी!
 शेवटी एक दिवस राहूरीस जाणार आहे असे सांगून टिळक गेले. दोन तीन दिवसांनी ते परत आले. आल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मजजवळ सहाशे रुपये ठेवायाला दिले आणि सांगितले हे पैसे रामसाहेबांचे आहेत. उद्यां अमूक अमूक गृहस्थ येणार आहेत, त्यांच्यापासून कर्जरोखा लिहून घेऊन पांचशे रुपये त्यांना द्यायचे. मी पक्की होतें.! मी म्हटले, ह्यूमसाहेबांचे पैसे आणि आपण कर्जरोखा लिहून घ्यायचा म्हणजे हे काय प्रकरण आहे?
 "हे बघ साहेबांना हे पैसे मिसेस ह्यूमच्या न कळत द्यायचे आहेत !" हे बोलणे मला पटले. मला वाटले ज्याप्रमाणे टिळकांना माझें भय वाटते त्याचप्रमाणे ह्यूमसाहेबांना मिसेस ह्यूमचे भय वाटत असेल!)
 दुसऱ्या दिवशी गृहस्थ आले, त्यांना पैसे दिले व रोखा लिहून घेतला. उरलेले पैसे बाजूला ठेवून दिले.
 हळू हळू घर विकल्याची बातमी माझ्या कानांवर आली! आणि ते अगदी सालंकृत कन्यादान! घर, घरांतील सामान, खुर्च्या, बांक, फळ्या, घडवंच्या, दिवे, पलंग, पाळणा, चिमबाबानें आणि मी मिळून वळलेली काथ्याची दोरखंडें! ह्या वेळेस ताटाबरोवर कांठहि गेला! नुसत्या विहिरीलाच पांचशे रुपये खर्च आला होता. पण विहिरीबरोबर शेत गेले आणि शेताबरोबर घरहि गेले! पण शंभर रुपये वर आले ! शिवाय दरमहा शाहाजीला द्यावे लागत होते ते सहा रुपये वांचले! हा काय कमी लाभ झाला?
 मी टिळकांना म्हटले
 "घर विकले त्याचे पैसे कोठे आहेत ? "
 "चांगले सुरक्षित आहेत. डॉ. ह्यूमजवळ ठेवले आहेत. उगाच त्रास देऊ नकोस." "त्यांतील सामान ?"
 "अग घर गेल्यावर सामन कोठे ठेवायचे?"
 “म्हणजे पाळणा दिवे हे विकण्यापर्यंत पाळी आली होती का? ते काही