पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
घ र गै लें म्है स आ ली

सर्वसंगपरित्याग करायला पाहिजे.”
 गुरुजी, आपण दोघे मिळून कांहीं सेवा करूं. आपल्यामागे कांहीं व्याप नको. काही उपाधी नको. मला वाटतें आपलें राहूरीचें घर विकून जो काही पैसा येईल त्या भांडवलावर एक दुकान काढूं आणि दुकानांत जो फायदा होईल तो जनसेवेसाठी खर्च करूं. मग कोणी गरजू आला तरी त्याला काही अडचण पडणार नाही." साधुबोवांच्या ह्या असल्या गप्पा चालत, त्या मी लक्ष्य लावून ऐकत असे. टिळकांनाहि घराची घिरघिर वाटत होतीच. तेहि म्हणू लागले, की घर जर विकले तर आलेल्या रकमेतून आपल्याला पुष्कळशा लोकोपयोगी कार्यास हातभार लावता येईल व पुष्कळ कामें करतां येतील.
 एक दिवस घरांत पाण्याचा ठणठणाट झाला. नगरांत त्यावेळी पाण्याचा आधीच दुष्काळ. टिळक निजले होते. त्यांच्याजवळ बुवा बसले होते. मी तेथे त्यांच्यापुढे एक भला मोठा पाण्याचा रिकामा हांडा नेऊन ठेवला.
 "हं घ्या बुवा! तुम्हाला सेवा करायला पाहिजे ना? घरांत आज पाण्याचा थेंब नाही. चला तुम्ही, दत्तू व बेबी आज पाणी भरा. हे सर्व स्वप्न आहे, माया आहे. तेव्हां त्याचे मनावर घेण्याचे कारण नाही." बुवा पाणी आणण्याची कां कू करू लागले. मी दुसरा डोस दिला-
 “हे पहा बुवा मी भाकरी भाजायला बसले व हात पोळले म्हणजे माझ्या हाताला येणारे फोड कांहीं मला मायेचे फोड वाटत नाहीत. मला त्या वेदना सहन होत नाहीत. पण तुमची सर्व मायाच असल्याने तुम्हाला कांही हरकत नाही. तुम्हांला हो कसला त्यांत विधिनिषेध वाटायला हवा ?
 टिळकांनाहि माझं बोलणे पटते आहे असें पाहून बुवा पाणी आणण्यास उठले. कण्हत कुंथत एक दोन हांडे पाणी भरल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले, की तुमची ही माया केवळ आमच्या राहूरीच्या घरावर आहे. ही खोटी माया आहे, तेव्हां उद्यांपासून तुम्ही आपला रस्ता सुधरा !
 दुसऱ्या दिवशी बुवा गेले. पण तेवढ्याने घरामागची ग्रहदशा आटोपली नाही.
 एक ख्रिस्ती माणूस कर्जाने अगदी गांजला होता. होता होईल तो कर्जबाजारी माणसाला कामावर ठेवू नये असा एक अमेरिकन मिशनचा नियम होता. ह्या माणसाचे काम गेलें तर बिचाऱ्याची फारच वाईट स्थिती