पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९
बाकी सारे मिथ्या आहे

 "दत्तू ! तूं कोणापुढे उभा आहेस ? काय ते लवकर खरे सांग."
 “पण पपा मी ती राहूरीलाच पाहिली."
 "तूं खरें सांग मी तुला मारणार नाही. भिऊ नको, खरं सांग."
 "ती राहूरीला आहे."
आतां मात्र धीर धरणे टिळकांना अशक्य झाले. त्यांनी शिडीवरूनच धबाधब दत्तूच्या पाठीत पुस्तकें फेंकण्यास सुरुवात केली. एकीकडे ते बोलतच होते.
 “मी-तुझ्या-हातांत-डिक्शनरी-पाहिली होती. मला खोटे ठरवितोस? तुम्ही सर्वांनी मिळून विचारच केला आहे का, की माझा पाणउतारा करायचा!"
 पण दत्तूचे आपलें तेंच. इकडे जहाल व मवाळ मंजुळाबाई मला सांगू लागल्या, तुम्ही जाऊन त्याला सोडवा. मी म्हणे, मी नाहीं मधे पडणार! थोडा वेळाने आपोआपच ज्वालामुखी शांत झाला.
 दोन महिन्यानंतरची गोष्ट. टिळक राहूरीला जाऊन आले. आल्याबरोबर त्यांनी दत्तूला बोलावले. "दत्तू मला क्षमा कर."
 दत्तू अगदीच विसरून गेला होता. "पपा तुम्ही काय केलंत?"
 त्याला पोटाशी धरून ते म्हणाले-
 “मी त्या दिवशी तुला उगीचच्या उगीच मारले. डिक्शनरी तुझ्या म्हणण्याप्रमाणे राहूरीलाच होती. माझ्या रागीटपणाबद्दल मला फार वाईट वाटते. मला क्षमा केलीस ना ? तुझ्याप्रमाणे माझीहि बालवृत्ति होईल तर किती चांगले होईल."
 ह्यानंतर टिळकांनी दत्तूच्या अंगाला शेवटपर्यंत कधी बोट लावलें नाहीं. नगरास पोंचल्यावर आमच्याकडे एक गोसावी आला.तो आमच्या घरी राहूं लागला. त्याचे बोलणे नेहमी विरक्ताचें असे. “देव सच्चिदानंद आहे. तोच एक आहे. बाकी सारे मिथ्या आहे. संसार ही माया आहे. त्यांत प्राणी बुडतो आहे. आपण कोठून आलों व कोठे चाललों याची त्याला जाणीव नाही. हा सारा भास पण ह्या भासालाच भुलून माणूस देवाला सोडून फिरत झाहे. कोणाची बायको, कोणाची मुलें, पैसा कोणाचा घर कोणाचें,