पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६: घर गेलें म्हैस आली

 गेल्या दोन प्रकरणांत कविसंमेलन व ठोंबरे ह्यांच्याविषयी सांगितले. ठोंबर्यांच्या गोष्टीचा ओघ चालू असतां आमच्या संसारांतीलहि मौजा चालू होत्याच.
 राहूरी सोडून आम्ही नगरास आलों ते फर्ग्युसन गेटच्या त्याच जुन्या घरांत राहूं लागलों. बरोबर आम्ही आमच्या चिमबाबाला आणले होते. मोठा सज्जन सरळ आणि विश्वासू माणूस होता तो. शहाजी भिल्ल सहा रुपये दरमहा घेऊन राहूरीला आमचे घर संभाळीत होताच
.  नगरास येतांच टिळकांनी प्रथम आपलें ऑफिस थाटले. राहूरीहून असतील नसतील ती बहुतेक पुस्तकें बरोबर आणली होती. थोडी मागें राहिली होती. आढ्यापर्यंत उंच पुस्तकांची कपाट लावून शिडीवर चढून टिळक पुस्तकें व्यवस्थितपणे ठेवीत होते. खाली दत्तू व रामभाऊ धर्माधिकारी त्यांच्या हातांशी करीत होते. पुस्तकें ठेवतां ठेवतां त्यांना वेब्स्टरच्या डिक्शनरीची आठवण झाली.
 सारें हपीस उलटे पालटे करून पाहिले पण डिक्शनरी सांपडेना त्यांना कोठे आठवण झाली, की दत्तूच्या हातांत ती पाहिली होती. त्यांनी दत्तूला विचारले,
 "काय रे दत्तू तूं एक दिवस माझी डिक्शनरी घेतली होतीस ना?"
 “नाही पपा, मी नाही घेतली."
 "तूं खोटे बोलतोस."
 "नाही मी कधीच खोटे बोलत नाही."
 “मी ती तुझ्या हातांत पाहिली."
 "नाही ती राहूरीसच राहिली."
 "का हो रामभाऊ तुम्ही डिक्शनरी येथे पाहिली होती ना?"
रामभाऊ गडबडले. होय म्हणावें तरी पंचाईत, नाही म्हणावें तरी पंचाईत त्यांना कांहींच कळेना. टिळकांनी आरडाओरडा करायला सुरवात केली. तेव्हां रामभाऊंचा निश्चय ठरला व त्यांना ती नगरासच पाहिली असल्याचे आठवलें.