पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७
साष्टांग नमस्कार

वलांडली, सात वनं वलांडली. त्यांना भेटला एक राजहंस. त्याने त्यांच्यावर साया केली. त्यानं बसविलं त्यांना एका रिक्षा खाली. आणि त्यानं घर बांधण्याचा विचार केला. त्यानं एक समिंद्र वलांडला, दोन समिंद्र वलांडले, तीन समिंद्र वलांडले."
 "बाई, त्यांनी सात समिंद्र ओलांडले, कबूल ! पण पुढे काय झाले त्या मुलांचे ते सांगा ना!'
 "थांबा ना भाऊ, अशी घाई नका करूं. त्या पक्षी राजाने एक काडी आणली, त्यानं दोन काड्या आणल्या, तीन काड्या आणल्या, चार-"
 "बाई त्या पक्ष्यांनी पर्वतप्राय काड्यांचा ढीग केला. पण पुढे काय झाले?"
 "थांबा ना भाऊ! असं काय करता? मग तो पक्षिराज दगड गोळा करूं लागला. त्यानं एक दगड आणला, दोन दगड आणले, तीन दगड आणले-"
 "त्यानें मेरू पर्वता एवढी दगडांची रास घातली. कबूल आहे मला. पण त्या मुलांचे काय झालें तें सांगा ना!"
 विहीण म्हणाली, "हे काय बरं भाऊ असं करतां! मला सांगू द्या ना-' ठोंबरे कंटाळला. त्याला झोप येऊ लागली. पण माझ्या विहिणीला गोष्टीचे फारच स्फुरण चढले. ती जी पडल्या पडल्या गोष्ट सांगत होती ती आतां उठून बसली!
 “भाऊ, उठा ना! आता काय अगदी उलीशी राहिली. उठून बसा ना-"
आमच्या सर्वांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. शेवटी ठोंबरे म्हणाला,
 "बाई मी तुमच्या पायां पडतों पण आतां मला झोपू द्या." पण तिने त्याला तीन वाजेपर्यंत झोप येऊ दिली नाही. तो निजला, की ती त्याला हालवून उठवायची व अशा रीतीने तिने आपली गोष्ट पुरी केली. पहाटें आम्ही उठलों पण ही दोघे बराच वेळ निजून राहिली. मी स्वैपाकघरांत होते. ठोंबरे उठल्याबरोबर तेथे आला व त्याने मला अगदी खरा खरा साष्टांग नमस्कार घातला.
 "लक्षुम्बाई अगदी हात जोडून, साष्टांग नमस्कार करतो तुम्हांला, तुमच्या विहिणीला आणि त्या तिच्या गोष्टीला. ही तुमची विहीण मोठी कादंबरीकत्री बनणार होती पण कोठे माशी शिंकली कोण जाणे." आम्हांला मात्र त्या रात्रांचे हे बिन पैशाचे नाटक पुढे कित्येक महिने पुरलें.