पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
बा ल क वि ठों बरे

असे. तिला गोष्टीहि पुष्कळ माहीत होत्या. शिवाय एकदां तिची ती गोष्ट सुरू झाली म्हणजे चार चार तास ती सहज चाले.
 ठोंबरे शाळेतून आल्यावर म्हणाला, “लक्ष्मीबाई गोष्ट सांगा ना."
 "हे बघ आज आली आहे माझी विहीण. तिला चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या, लांब लांब गोष्टी येतात. ती सांगणार आहे आज तुला गोष्ट!"
 माझ्या ह्या बातमीनें ठोंबऱ्याला खूप आनंद झाला.
 जेवणी होऊन निजायाला जाण्याच्या वेळेपर्यंत त्याने बाहेरून आंत व आंतून बाहेर कितीतरी खेपा घातल्या.
 नेहमीप्रमाणे आम्ही सारे एका दंडाळीला निजलों. भास्कर, दत्तू , बेबी, मी, माझी विहीण, ठोंबरे वगैरे. मुलांना माझ्या विहिणीच्या गोष्टीचा चांगला परिचय असल्याने ती सारी तोंडावर पांघरुणे घेऊन ठोंबऱ्याला हसत पडली होती. इकडे आज आपल्याला मोठी गोष्ट ऐकायाला मिळणार म्हणून ठोंबरे आनंदात होता. त्याने माझ्या विहिणी शेजारी जागा पटकाविली, अंथरुणांवर खुरमांड्या घातल्या व कान टवकारून तो गोष्ट ऐकू लागला. गोष्टीला सुरुवात झाली ती गोष्ट अशी-
 "हे बघा भाऊ! एक उज्जनीचा राजा होता. त्याच्या अस्तुरीला होती एक कार, एक पुत्र. ती त्याची पहिली अस्तुरी गमावली. त्यानं केली दुसरी अस्तुरी. त्या दुसऱ्या अस्तुरीला सवतीची पोरं नको होती. तिनं केलं ढोंग, की आपले डोळे लई बिघडले. ती म्हणाली मला एका जोशाने सांगितले आहे, की दोन्ही मुलांनी मिळून वनांत जाऊन त्रासाचं काळीज आणाव व मला खायला द्यावं. मग माझे डोळे बरे होतील."
 "त्रासाचं काळीज? त्रासाला कसं काळीज असणार?" ठोंबरे म्हणाला.
 "त्रासाचं नाहीं भाऊ तारसाचं. राजानं अस्तुरीचं ऐकून दोन्ही पोरं वनांत सोडली. ते निघाले. एक वन वलांडलं, दोन वनं वलांडली, तीन वनं वलांडली, चार वनं वलांडली, पांच-
 "अहो बाई त्यांनी हजार वनं वलांडली. पुढे काय झाल ते सांगा." ठोंबरे म्हणाला. विहीण उत्तरली,
 "थांबा ना भाऊ. अशी घाई करूं नका. पांच वनं वलांडली, सहा वनं