पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
बालकवि ठोंबरे

वाटले. एक दिवस भाऊजी बाहेर आले. तेथें ठोंबरे होता. त्यांनी त्याला ठोंबरे इकडे ये-का कांहीं म्हटले वाटते. तो त्यांचे न ऐकतां तडक घरांत माझ्याकडे आला. मी स्वैपाक करीत होते. तो माझ्यापुढे बसला.
"लक्षुम्बाई मला तुमच्या दिराचे वागणे अगदी पसंत नाही. हे कोण एवढे मोठे? मला सारे मान देतात. टिळकसुद्धा मला अरे तुरे म्हणत नाहीत आणि ह्यांनी कां मला अरे तुरे म्हणावे. मी त्यांना आतां जाऊन चांगले समजावतो."
 “अरे बाबा त्यांना काही बोलू नको मी नाही का तुला अरे तुरे म्हणत?"
 "तुमची गोष्ट वेगळी. तुम्ही माझ्या आईच्या जागी आहां. तुम्ही माझ्या खस्ता खाल्ल्या आहेत. माझ्या आजारांत हे आले होते का काम करायला ? 'हे कोण?”
 "ते माझे दीर! माझ्यासाठी त्यांना काही बोलू नको-"
 हे बोलणे चालले आहे तोच भाऊजी घरांत माझ्याकडे आले. आपल्या भावजयीशी ठोंबरे भांडत आहेत व तो त्यांची समजूत करीत आहे! हे काय प्रकरण आहे त्यांना कळेना. त्यांनी ठोंबऱ्यांना विचारले काय झालें. तों तो आणखी उसळला, भाऊजी म्हणाले.
 “ठोंबरे मी आगदी सहज अरे तुरे म्हणत होतो. पुन्हां नाही कधी म्हणणार. माझी चूक झाली. मला नाही वाटलें तुम्हांला इतका राग येईल." आणि त्या दिवसापासून ते त्याला अहो जाहो म्हणू लागले  मीहि त्याला अहो जाहो म्हणू लागले.
 पण मला तें साधेना आणि ठोंबऱ्याला ते आवडेना. तो एक दिवस माझ्याजवळ येऊन बसला. 'लक्षुम्बाई आतां किती दिवस असे हे चालायचे? मला एकदां तुम्ही दिलेल्या नांवाने हाक मारा पाहूं!'
मी म्हटले “चल मूर्खा !" मग तो हांसला आणि मीहि हांसले. मी त्याला फार प्रेमानें बोलायचे झाले म्हणजे मूर्खा म्हणे व त्याने त्या दिवशी मी दिलेल्या पदवीचा उच्चार करून घेतला तेव्हां त्याचे समाधान झाले.
 ठोंबरे आमच्या घरी आल्यावर त्याला विषमज्वर झाला होता. चाळीस