पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
बाळ फाटक लाव

त्यांनी म्हटले 'हो.
'बसा. मुले बाहेर गेली आहेत. ती आल्यावर तुम्हाला खाणावळींत घेऊन जातील. दूध, केळी वगैरे आमच्या घरचे तुम्हाला चालत असेल तर देतें.' ठोंबऱ्यांनी काही आढेवेढे न घेतां दूध व केळी घेतली. थोड्या वेळाने दत्तू आला. त्याच्याबरोबर त्याचे मित्र मुळे व पारनाईक हेहि आले. त्यांनी ठोंबऱ्यांना खाणावळीत नेले. तेथे ते पुढे जाऊ लागले. राहणे आमच्याकडेच होते. (एक. दोन दिवसांत टिळक आले. त्यांनी बाजारांत जाऊन कॉडलिव्हर ऑईल आणले व ठोंबऱ्यांना सशक्त करण्याचे ठरविले.)
 ठोंबरे आला तेव्हां तेवढ्यापुरतें एकदांच मी त्याला अहो जाहो म्हटले; परंतु लागलीच आमच्यांतला परकेपणा नाहीसा झाला. मी त्याला अरे तुरे करूं लागले व त्याचाहि खिन्नपणा एका दिवतांत मावळला. आपण कोठे जाऊन पडतो आहों कोणास ठाऊक, असें त्याला झाले होते. खिस्ती माणसें म्हणजे कोणी राक्षस किंवा भुते असावीत अशी त्याची भावना होती. आणि त्याने पुढे तसे कित्येक वेळेला आम्हाला सांगितलेंहि; पण एकदोन दिवसांतच आम्ही माणसे आहों व चांगली त्याला आवडतील अशी माणसे आहो अशी त्याची खात्री झाली. दत्तूची व त्यांची ताबडतोब गट्टी जमली. तशीच दत्तूच्या मित्रांची व त्याचीहि तितकीच गट्टी जमली. ठोंबरे घरांतील मुलांप्रमाणेच वागू लागला.
 तो आला तेव्हा मी लोळतच होते. त्यालाच सांगितले 'बाळ ते कपाट उघड नि त्यांतून दूध काढून घे.' नंतर बाळानें दूध घेतल्यावर कप तेथेच ठेवला. तेव्हां पुन्हां सांगितले 'बाळ तेवढा कप उचलून ठेव बरें' ह्यावरून तो पुढे माझी नेहमी चेष्टा करायचा, की 'लक्षुम्बाई पंचम जॉज • तुमच्याकडे कधी आले तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगाल, की 'बाळ तेवढे फाटक लाऊन घे बरें येतांना.'
 पण माझ्या एकेरी नांवाने त्याला हांका मारण्यामुळे एकदा मोठा अनर्थ झाला. माझें ऐकून भाऊजाहि त्याला एकेरी नांवाने हांका मारूं लागले. ठोंबरे दत्तू बरोबरचा. मोठा कवि झाला तरी बालकविच. त्याला एकेरी नांवाने हाका मारायला काय हरकत आहे असे त्यांना